भारताला शह देण्यासाठी चीनकडून सैन्यात तिबेटी तरुणांची भरती

बीजिंग – भारताला शह देण्यासाठी चीनकडून सैन्यात तिबेटी तरुणांची भरती केली जात आहे. भारत आणि चीन यांच्या सीमेवरील वातावरण अतिशय थंड आहे. या वातावरणात चिनी सैनिकांना पहारा देणे अत्यंत कठीण जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. तेथील वातावरणामुळे अनेक चिनी सैनिकांची प्रकृती ढासळत आहे. त्या तुलनेत याच वातावरणात चिनी सैन्यातील तिबेटी सैनिक मात्र अधिक चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे चीनच्या निदर्शनास आले. त्यामुळे आता चीनने त्याच्या सैन्यात तिबेटी तरुणांची भरती चालू केली आहे. अमेरिकेने नुकतेच लडाखजवळील पँगाँग सरोवराजवळ चिनी सैन्याकडून मोठ्या प्रमाणात बांधण्यात येणारे पूल, रस्ते आणि हवाई धावपट्टया ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे, अशी चेतावणी दिली होती. त्यात आता चीनने भारतासमोर तिबेटी तरुणांच्या रूपातील आणखी एक आव्हान उभे केल्याचे सांगितले जात आहे.

नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालानुसार चीनच्या सैन्यात तिबेटींची भरती ही १५.७ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी चीनने ४७२ तिबेटी तरुणांना त्यांच्या सैन्यात भरती केले होते. इतकेच नव्हे, तर चीनने ६ ते ९ वर्षे वयोगटांतील तिबेटी मुलांना सैनिकी शिक्षण देण्यासाठी विशेष शाळाही चालू केल्या आहेत.

संपादकीय भूमिका 

अशा कुरापतखोर चीनचा बंदोबस्त सरकार कधी करणार आहे ?