सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !
‘प्राचीन काळी संस्कृत ही आर्यावर्तातील ज्ञानभाषा आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे संस्कृतपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या भाषांचे व्याकरणही स्वतंत्रपणे लिहिले गेले; मात्र त्याचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच होता. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर आणि संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.
मागील लेखात आपण ‘लिखित भाषेत ‘स्वल्पविराम’ हे विरामचिन्ह कुठे वापरावे ?’, या संदर्भातील काही सूत्रे पाहिली. आजच्या लेखात त्यापुढील सूत्रे पाहू. (लेखांक ८ – भाग ५)
‘स्वल्पविराम’ आणि तो वापरण्याची पद्धत !
२ इ. स्वल्पविराम
(टीप : ‘स्वल्पविरामा’च्या वापराविषयीची ‘२ इ १’ ते ‘२ इ ४’पर्यंतची सूत्रे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या शनिवार, ९.४.२०२२ या दिवशीच्या अंकात आणि ‘२ इ ५’ ते ‘२ इ ८’पर्यंतची सूत्रे शुक्रवार, १५.४.२०२२ या दिवशीच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली आहेत.)
२ इ ९. वाक्यात ‘अन्यथा’ हा शब्द येणे : कोणत्याही वाक्यात जेव्हा ‘अन्यथा’ हा शब्द येतो, तेव्हा या शब्दाच्या आधी स्वल्पविराम द्यावा, उदा. व्यवस्थित अभ्यास कर, अन्यथा परीक्षेत अल्प गुण मिळतील.
२ इ १०. वाक्यात अवतरणचिन्हे येणे
२ इ १० अ. वाक्यात दुहेरी अवतरणचिन्ह येणे : वाक्यात जेव्हा ‘एखादी व्यक्ती स्थुलातून काय बोलली ?’, हे आपल्याला लिहावयाचे असते, तेव्हा ते बोलणे आपण दुहेरी अवतरणचिन्हात लिहितो, उदा. दीपिका म्हणाली, ‘‘हे काम आपण उद्यापर्यंत पूर्ण करू.’’ या वाक्यात दीपिका जे म्हणाली, ते आपण दुहेरी अवतरणचिन्हात लिहिले आहे. असे कोणतेही लिखाण दुहेरी अवतरणचिन्हात लिहितांना अवतरणचिन्हाच्या आधी स्वल्पविराम द्यावा. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
१. स्वप्नीलने सांगितले, ‘‘या मैदानात आठ दिवसांनी आमच्या संस्थेची सभा आहे.’’
२. शिल्पाने हसून विचारले, ‘‘यात एवढे ताण घेण्यासारखे काय आहे ?’’
३. स्मिता उद्गारली, ‘‘किती सुंदर फुले आहेत येथे !’’
२ इ १० आ. वाक्यात एकेरी अवतरणचिन्ह येणे : ज्याप्रमाणे व्यक्तीचे प्रत्यक्ष बोलणे आपण दुहेरी अवतरणचिन्हात लिहितो, त्याप्रमाणे तिच्या मनातील विचार, मनातील एखादा प्रश्न, कल्पना किंवा डोळ्यांसमोर दिसलेले दृश्य लिहितांना आपण ते एकेरी अवतरणचिन्हात लिहितो. या एकेरी अवतरणचिन्हाच्या आधी स्वल्पविराम द्यावा. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
१. माझ्या मनात आले, ‘यांची मैत्री किती घनिष्ठ आहे नाही !’
२. मीनलला प्रश्न पडला, ‘आता पुढे काय करायचे ?’
३. भजन म्हणतांना अण्णांना वाटले, ‘प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्याकडे पाहून प्रेमाने हसत आहे.’
२ इ १० इ. वाक्यात अवतरणचिन्हातील लिखाण आधी आणि ते लिखाण ज्याने प्रत्यक्ष उच्चारले आहे किंवा ज्याने त्या लिखाणात दिलेला विचार केला आहे, त्याचा उल्लेख नंतर येणे : काही वेळा अवतरणचिन्हातील लिखाण अगोदर येते आणि जी व्यक्ती ते लिखाण बोलली आहे किंवा जिच्या मनातील तो विचार आहे, तिचे नाव नंतर येते. याचे एक उदाहरण पुढे दिले आहे.
‘‘आई, मी मैत्रिणीकडे जाऊन येते’’, असे म्हणत सोनाली घराबाहेर पडली.
वरील वाक्यामध्ये सोनाली जे बोलली, ते आधी आले आहे आणि सोनालीचे नाव नंतर आले आहे. अशा वेळी अवतरणचिन्ह पूर्ण झाल्यावर स्वल्पविराम द्यावा. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
१. ‘‘अंगणात चांदण्या पहात झोपायला मला फार आवडते’’, पिंटू म्हणाला.
२. ‘‘यंदा देवाच्या पालखीच्या वेळी दोन्ही मुले घरी येणार आहेत’’, अप्पांनी आजींना सांगितले.
३. ‘गावी गेल्यावर मी आधी मनीला आणि तिच्या पिल्लांना भेटणार’, मधूने ठरवले.
४. ‘एकदा हिमालय पहायलाच हवा’, अनुपच्या मनात आले.
२ इ ११. ‘यांसारख्या’ या शब्दापूर्वी स्वल्पविराम कधी द्यावा आणि कधी देऊ नये ?
२ इ ११ अ. ‘यांसारख्या’ या शब्दाच्या आधी स्वल्पविराम देण्याशी संबंधित नियम : ‘यांसारख्या’ या शब्दाच्या आधी ‘घेणे’, ‘जाणे’, ‘फिरणे’, ‘करणे’, असे ‘णे’ हे अक्षर शेवटी असलेले शब्द असल्यास ‘यांसारख्या’ या शब्दापूर्वी स्वल्पविराम द्यावा. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
१. लोकांच्या घरी दूध पोचवणे, वर्तमानपत्रे टाकणे, गाड्या धुणे, यांसारखी कामे करून त्याने शिक्षण पूर्ण केले.
२. खरे बोलणे, वेळेचे पालन करणे, नियम पाळणे, यांसारखे गुण प्रत्येकाने स्वतःच्या अंगी बाणवणे आवश्यक आहे.
३. नामजप करणे, प्रार्थना करणे, देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, यांसारख्या प्रयत्नांमुळे आपण देवाच्या अनुसंधानात रहातो.
२ इ ११ आ. ‘यांसारख्या’ या शब्दाच्या आधी स्वल्पविराम न देण्याविषयीचा नियम : ‘यांसारख्या’ या शब्दाच्या आधी वरील सूत्र क्र. ‘२ इ ११ अ’मध्ये दिल्याप्रमाणे शेवटी ‘णे’ हे अक्षर असलेला शब्द न येता अन्य शब्द आल्यास ‘यांसारख्या’ या शब्दापूर्वी स्वल्पविराम देऊ नये. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
१. डोकेदुखी, पोटदुखी, मळमळ यांसारख्या विकारांवर हे औषध चांगले आहे.
२. कबड्डी, मलखांब, कुस्ती यांसारख्या खेळांत तो प्रवीण आहे.
३. आई-वडील, शिक्षक यांच्यासारख्या वडीलधाऱ्यांसमोर तो नेहमीच नम्रपणे वागतो.
२ इ १२. ‘इत्यादी’ या शब्दाच्या आधी स्वल्पविराम न देणे : ‘इत्यादी’ या शब्दाच्या आधी कधीही स्वल्पविराम देऊ नये, उदा. आमच्या अंगणात चिमण्या, साळुंख्या, खारी इत्यादींचा मुक्त वावर असतो.
(क्रमशः पुढील शुक्रवारी)
– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.४.२०२२)