दर्जा खालावलेल्या वृत्तवाहिन्या !

प्रतिकात्मक छायाचित्र

एका कलाकाराला दूरचित्रवाहिनीने एका मराठी मालिकेतून काढून टाकले. त्याविषयी त्या कलाकाराने केलेल्या ट्वीटच्या आधारे एका प्रसिद्ध मराठी वृत्तवाहिनीने चर्चासत्र घेतले. त्या ट्वीटमध्ये संबंधित अभिनेत्याने ‘मी राजकीय विषयावर टिपणी केल्याने मला मालिकेतून काढून टाकण्यात आले’, असा दावा केला होता. त्या विषयावरील चर्चासत्रात २ कलाकार, १ मालिका निर्माते, मनोरंजन क्षेत्रातील १ प्रतिनिधी आणि राजकीय पक्षांचे २ प्रतिनिधी सहभागी होते. त्यामुळे चर्चा महत्त्वाच्या विषयावर असेल, असे वाटले; मात्र चर्चा चालू झाल्यावर प्रेक्षकांचा भ्रमनिरास झाला. स्वत:ला ‘क्रमांक १’ची वृत्तवाहिनी म्हणवणार्‍या वाहिनीने अशा उथळ विषयावर चर्चा घेणे याविषयी आश्चर्य वाटले ! यातून वाहिन्यांच्या संपादकांची ग्रहणक्षमता आटली आहे कि त्यांची दिशाभूल झाली आहे ? हे लक्षात येईना. या घटनेच्या खोलात गेल्यावर समजले की, संबंधित कलाकाराने मालिकेच्या ‘सेट’वर काही महिला कलाकारांशी गैरवर्तन केले होते, गोंधळ घातला होता, तसेच अपशब्द उच्चारले होते. परिणामी त्यांना अनेक वेळा समज देऊनही त्यांच्यात सुधारणा न झाल्याने त्यांना मालिकेतून काढून टाकले होते. स्वत: या महिलांनीच त्या कलाकाराच्या गैरवर्तनाचे किस्से सांगितले. यामुळे या आघाडीच्या वृत्तवाहिनीची तोंडावर आपटल्याप्रमाणे अवस्था झाली.

मुळात चर्चा उथळ विषयावर घ्यायची आणि वर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना ‘तुम्ही असे का केले ? तसे का केले ?’, असे विचारायचे म्हणजे उथळपणाचे टोक (परिसीमा) गाठणेच आहे. एका वाहिनीने ही चर्चा घेतली म्हणून अन्य वाहिन्यांनीही दुसर्‍या दिवसापासून ‘जणू राज्यातील हा एक ज्वलंत प्रश्न बनला आहे’, या अविर्भावात चर्चा घेतल्या, तसेच त्यात पुन्हा महिला आयोगाची उडी ! त्याने संबंधित आस्थापनाच्या प्रमुखांना ‘कलाकाराला मालिकेतून का काढले ? याची कारणे द्या’, अशी नोटीसच बजावली. या कलाकाराने केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखावर टीकाटीप्पणी केल्यामुळे त्या पक्षाचे ‘राजकीय दायित्व’ बनले आणि त्यांनी हा एक प्रतिष्ठेचा अन् राजकीय हिशोब चुकता करण्याचा विषय केला. यातून पत्रकारिता लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, हे कुठच्या कुठे गेले आहे, याचे भान ना वाहिन्यांना आहे, ना सामान्य जनतेला आहे, याचे वैषम्य आहे. राष्ट्रप्रेमी नागरिकांनी यामध्ये पुढाकार घेऊन अशा वार्तांकनाच्या संदर्भात वैध मार्गाने विरोध केला पाहिजे. हिंदु राष्ट्रात वृत्तवाहिन्यांवर समाजोपयोगीच वृत्ते दाखवली जातील.

– श्री. यज्ञेश सावंत, देवद आश्रम