खाद्यपदार्थ वृत्तपत्रांत गुंडाळून विक्री करणे आरोग्याला घातक असल्याने त्यावर बंदी घाला !

‘आरोग्य साहाय्य समिती’ची अन्न आणि औषध प्रशासनाकडे मागणी

ही गोष्ट अन्न आणि औषध प्रशासनाला का सांगावी लागते ? आरोग्याला घातक गोष्ट त्यांच्या लक्षात का येत नाही ?

पणजी, २८ डिसेंबर – खाद्यपदार्थ वृत्तपत्रांत गुंडाळून विक्री करणे आरोग्याला घातक असल्याने त्यावर बंदी घालावी, अशी मागणी ‘आरोग्य साहाय्य समिती’ने अन्न आणि औषध प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ‘आरोग्य साहाय्य समिती’च्या वतीने श्री. भारत हेगडे आणि श्री. महेश प्रभु यांनी हे निवेदन दिले.

अन्न आणि औषध प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर डावीकडून श्री. भारत हेगडे आणि श्री. महेश प्रभु

या निवेदनात म्हटले आहे की,

उपाहारगृहे किंवा खाद्यपदार्थ विक्री करणारे गाडे (फिरती दुकाने) वडापाव, भजी आदी खाद्यपदार्थ्यांची विक्री करतांना ते वृत्तपत्राच्या कागदांमध्ये गुंडाळून विकत असल्याचे आढळून आले आहे. वास्तविक ‘फूड सेफ्टी आणि स्टॅँडर्ड्स अ‍ॅक्ट- २००६’ या कायद्यानुसार प्रत्येक ग्राहकाला सुरक्षित आणि शुद्ध खाद्यपदार्थ देणे बंधनकारक आहे.

खाद्यपदार्थ वृत्तपत्रांत गुंडाळून विक्री करणे आरोग्याला घातक

हा कायदा देशात ५ ऑगस्ट २०११ पासून लागू झालेला आहे. तसेच ‘फूड सेफ्टी अँड स्टॅँडर्ड्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’ (एफ्.एस्.एस्.ए.आय.) यांनी ६ डिसेंबर २००६ मध्ये काढलेल्या एका आदेशानुसार ‘फूड सेफ्टी अँड स्टॅँडर्ड्स अ‍ॅक्ट- २००६’ या कायद्याचे पालन करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे; मात्र या कायद्याची कठोरतेने कार्यवाही होतांना दिसत नाही. वृत्तपत्राच्या कागदात गरम खाद्यपदार्थ गुंडाळले जातात, तेव्हा वृत्तपत्राच्या कागदामधील ‘आयसोबुटायलीन थायलेट’ आणि ‘डायिंग आयसोबुटायलीन’ ही रसायने विरघळून खाद्यपदार्थ आरोग्याला अपायकारक बनतो. वृत्तपत्राची शाई खाणार्‍याच्या पोटात गेल्यास त्याला पचनाच्या समस्याही निर्माण होऊ शकतात. गोव्यात अन्न आणि औषध प्रशासनाने याविषयी जागृती करून असे प्रकार रोखावेत.