अवैध पशूवधगृहे उद्ध्वस्त करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या आंदोलनामुळे ४ पशूवधगृहे त्वरित ‘सील’ !

अवैध पशूवधगृहे बंद करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांना आंदोलन का करावे लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? – संपादक 

संगमनेर (नगर), ८ ऑक्टोबर – शहरात मोठ्या प्रमाणावर गायींची कत्तल केली जात आहे. शहरातील जमजम कॉलनी आणि परिसरात खुलेआम अवैध पशूवधगृहे चालवली जातात. ही पशूवधगृहे बंद करावीत आणि सराईत गुन्हेगारांना तडीपार करावे, या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ४ ऑक्टोबर या दिवशी प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. अधिकार्‍यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर रात्री विलंबाने हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने रात्री साडेदहा वाजता शहरातील ४ पशूवधगृहे ‘सील’ केली. येत्या २ दिवसांत सर्व पशूवधगृहे उद्ध्वस्त करण्याची, तसेच पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचीही लेखी हमी अधिकार्‍यांनी दिली आहे.

संगमनेर शहरात अनुमाने १० पशूवधगृहे चालू आहेत यातील अवैध ४ पशूवधगृहे  ‘सील’ करण्यात आल्याने उर्वरित पशूवधगृहांवर कारवाई कधी करणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या दुर्लक्षामुळेच शहरात अवैध पशूवधगृहे चालू असल्याचे हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या पदाधिका‍र्‍यांनी म्हटले आहे. याविषयी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संगमनेर शिवसेना पदाधिकारी यांनी सुद्धा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत.

सामाजिक कार्यकर्ते जैन यांनी वाचा फोडल्याने तीव्रता वाढली !

भिवंडी येथील सामाजिक कार्यकर्ते यतीन जैन यांनी या प्रकरणात लक्ष घालून वरिष्ठ पोलीस अधिका‍र्‍यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर नाशिक आणि नगर येथील पोलिसांनी संगमनेर येथे येऊन पशूवधगृहांवर कारवाई केली. यानंतर पशूवधगृहांच्या प्रश्नाची तीव्रता वाढली. शहरातील हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक झाल्या. पशूवधगृहांचे संपूर्ण दायित्व शहर पोलिसांचे असूनही त्यांचे या पशूवधगृहांकडे दुर्लक्ष झाले होते. आर्थिक संबंधामुळेच ही पशूवधगृहे चालू असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.