कुडाळ – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस्.टी.च्या) सिंधुदुर्ग जिल्हा विभाग नियंत्रक पदावर रसाळ नामक निवृत्त कर्मचार्याची नेमणूक करण्यात आली आहे. एस्.टी. महामंडळ डबघाईला आले असतांना, निवृत्त कर्मचार्याला खास वेतन देऊन कामावर का घेतले ? असा कोणता पराक्रम या कर्मचार्याने केला ? त्यामुळे या नेमणुकीच्या विरोधात ‘जनआक्रोश’ आंदोलन केले जाईल, अशी चेतावणी नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी दिली आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नाडकर्णी यांनी म्हटले आहे की, एस्.टी. प्रशासनाकडे सध्या असलेल्या कर्मचार्यांना वेतन द्यायला पैसे नसून कर्मचार्यांचे ३-३ मासांचे वेतन रखडले आहे. अशा परिस्थितीमध्ये निवृत्त कर्मचार्याची नेमणूक करून त्याचे लाड का पुरवले जात आहेत ? याची माहिती प्रशासनाने लवकरात लवकर जनतेला देणे आवश्यक आहे. जर कामावर ठेवायचे होते, तर एस्.टी. प्रशासनाने त्यांना निवृत्त का केले ? असा प्रश्न निर्माण होतो. कुणाच्या सांगण्यावरून याची नेमणूक झाली ? महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना अशा कर्मचार्याला त्यागपत्र द्यायला भाग पाडल्याविना रहाणार नाही. कारण एस्.टी. प्रशासनाला त्याचा लाभ अल्प आणि तोटा अधिक आहे.