काँग्रेसने मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना श्रीकृष्णाच्या, तर विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कंसाच्या रूपात दाखवले !

काँग्रेसचे नेते शहयार खान यांच्याकडून समर्थन

  • हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांवर देशात कोणतीही कारवाई होत नाही, हे लक्षात घ्या ! आज देशात ईशनिंदेसारखा कायदा असता, तर हिंदुद्वेषी काँग्रेसवर कठोर कारवाई करता आली असती ! आतातरी केंद्र सरकार अशा प्रकारचा कायदा करण्याचा प्रयत्न करील, अशी अपेक्षा ! – संपादक
  • हिंदूच अशा प्रकारे हिंदूंच्या देवतांचा अवमान करण्यात आघाडीवर असतात. त्यामुळे ‘आपत्काळात अशा हिंदूंना श्रीकृष्णाने तरी का वाचवावे ?’ असा प्रश्‍न कुणाच्या मनात उपस्थित झाल्यास आश्‍चर्य ते काय ? तरीही अशांना आता साधना शिकवणे आवश्यक आहे ! – संपादक
  • शहयार खान यांच्या धर्मातील श्रद्धास्थानाचा असा अवमान काँग्रेसकडून झाला असता, तर त्यांनी असेच समर्थन केले असते का ? आणि मग त्यांच्या धर्मबांधवांनी त्यांना सोडले असते का ? हिंदू धर्माभिमानशून्य असल्याने त्यांच्या देवतांचा असा अवमान करण्याचे धाडस होते, हे हिंदूंना लज्जास्पद ! – संपादक
डावीकडे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना श्रीकृष्ण आणि राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान कंसाच्या रूपात

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या फलकावर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना श्रीकृष्ण, तर भाजपचे नेते अन् राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कंसाच्या रूपात दाखवण्यात आले. भाजपने याला हिंदु धर्माचा आणि देवतांचा अवमान सांगत टीका केली आहे.

याविषयी काँग्रेसचे नेते शहयार खान म्हणाले की, वर्ष २०२३ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला धडा शिकवण्यात येणार आहे. जेव्हा पृथ्वीवर पाप वाढते तेव्हा भगवान कुणाला तरी ते नष्ट करण्यासाठी पाठवतो. (जिहादी आतंकवादी, धर्मांध, यांच्यामुळे पृथ्वीवर वाढत असलेले पाप नष्ट करण्याविषयी शहयार खान का बोलत नाहीत ? – संपादक) कमलनाथ विकासपुरुष आहेत. त्यांनी छिंदवाडा येथे विकास केला आहे. शिवराजसिंह चौहान यांनी काहीही केलेले नाही.

काँग्रेसची हिंदुद्वेषी मानसिकता दिसून आली ! – भाजप

गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी टीका करतांना म्हटले की, काँग्रेस नेहमीच हिंदु धर्माची थट्टा करत असते. पूर्वी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना श्री दुर्गादेवी, तर आता कमलनाथ यांना श्रीकृष्णाच्या रूपात दाखवले आहे. काँग्रेस नेहमीच असे काम करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावते. यातून काँग्रेसची मानसिकता स्पष्ट होते. (नरोत्तम मिश्रा गृहमंत्री आहेत, तर त्यांनी तात्काळ गुन्हा नोंदवून संबंधितांवर कारवाई करणे अपेक्षित आहे, असेच धर्माभिमानी हिंदूंना वाटते ! – संपादक)

बिहारमध्ये लालूप्रसाद यांनाही भगवान श्रीकृष्णाच्या रूपात दाखवले !

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

दुसर्‍या घटनेत बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना सुदर्शनचक्र हातात घेतलेल्या श्रीकृष्णाच्या रूपात दाखवण्यात आले आहे. लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी फेसबूकवरून हे चित्र प्रसारित केले आहे. (बिहारमध्येही भाजप सत्तेत आहे, तर त्याने तात्काळ तेजप्रताप यादव यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक)