हिंदुत्वनिष्ठ ‘द ऑर्गनायझर’ नियतकालिकाची भूमिका !
नवी देहली – ऐतिहासिकदृष्ट्या ज्या धार्मिक स्थळांवर पूर्वी अतिक्रमण झाल्याचा इतिहास आहे, अशा ठिकाणांचे सत्य समोर येणे आवश्यक आहे. अशा ठिकाणांचा खरा इतिहास माहिती होणे, हे संस्कृतीमूलक न्यायासाठी आवश्यक आहे, अशी भूमिका ‘द ऑर्गनायझर’ या रा.स्व. संघाच्या विचारांशी संबंधित असणार्या नियतकालिकाच्या मुख्य लेख आणि संपादकीय यांत मांडण्यात आली आहे. या नियतकालिकाने छापलेल्या लेखामध्ये संभल येथील शाही मशिदीच्या वादाचे सूत्र उपस्थित करण्यात आले आहे. या ठिकाणाच्या शाही जामा मशिदीच्या जागी श्री हरिहर मंदिर होते, असे सांगितले जात आहे. ‘संभलमध्ये अशा प्रकारच्या सामाजिक संघर्षाचा इतिहास राहिला आहे’, असे या लेखात म्हटले आहे.
या नियतकालिकाच्या लेखात लेखक आदित्य कश्यप यांनी म्हटले आहे की, ऐतिहासिक दृष्टीने झालेल्या चुका मान्य करणे, हा एक प्रकारे झालेला अन्याय मान्य करण्याचाच भाग आहे. यातून पुढे चर्चेचा आणि जखमा भरून निघण्याच्या प्रक्रियेचा आरंभ होऊ शकेल. तसेच यातून समाज एकत्र येण्यास हातभार लागेल; कारण पारदर्शकतेतून परस्पर सामंजस्य आणि सन्मान वाढेल.
हा लढा धार्मिक वर्चस्ववादाचा नसून आपली राष्ट्रीय ओळख स्पष्ट करण्याच्या संदर्भात आहे !
अशी सुस्पष्टता प्रत्येक हिंदूमध्ये निर्माण होऊन त्याने या ऐतिहासिक राष्ट्रकार्यात त्याच्या क्षमतेनुसार सहभागी झाले पाहिजे.
संपादकीयामध्ये पुढे म्हटले आहे की,
१. मानवी संस्कृतीमूलक न्यायाच्या होत असलेल्या मागणीची नोंद घेण्याची वेळ आता आली आहे.
२. बाबासाहेब आंबेडकर यांनीही जातीआधारित भेदभावाच्या कारणांच्या मुळाशी जाऊन त्यावर राज्यघटनात्मक उपाय दिले.
३. धार्मिक असंतोष संपवण्यासाठी आपल्यालाही तशाच दृष्टीकोनाची आवश्यकता आहे. मुसलमान समाजाने सत्याचा स्वीकार केला, तरच हे शक्य होऊ शकेल. इतिहासातल्या सत्याचा स्वीकार करण्याचा हा दृष्टीकोन भारतीय मुसलमानांना मूर्तीभंजनाचे पाप असणार्यांपासून आणि धार्मिक वर्चस्ववादाच्या भूमिकेपासून स्वतंत्र ठेवेल. त्याखेरीज संस्कृतीमूलक न्यायाच्या मागणीची नोंद घेत शांतता आणि सौहार्द यांची आशा जागृत करेल.
४. खोट्या धर्मनिरपेक्षतावादाचे समर्थन करणार्या केवळ काही ठराविक बुद्धीवाद्यांच्या आग्रहापोटी अशा प्रकारे न्याय आणि सत्य जाणून घेण्याचा अधिकार नाकारणे, यातून कट्टरतावाद, फुटीरतावाद अन् शत्रुत्व यांना प्रोत्साहन दिले जाऊ शकते.
५. सोमनाथपासून संभलपर्यंत आणि त्याहीपुढे, अशा ठिकाणांचे सत्य जाणून घेण्याचा हा लढा धार्मिक वर्चस्ववादाचा नाही. हा लढा म्हणजे आपली राष्ट्रीय ओळख स्पष्ट करण्याच्या संदर्भात आहे.