Illegal Indian Migrants : मुंबई आणि नागपूर येथील केवळ २ दलालांनी प्रतिवर्षी जवळपास ३५ सहस्र बेकायदेशीर स्थलांतरितांना परदेशात पाठवले !

कॅनडातील २६० महाविद्यालयांचा मानवी तस्करीशी संबंध

नवी देहली – अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) १० डिसेंबर आणि १९ डिसेंबर या दिवशी मुंबई, नागपूर, तसेच गुजरातच्या गांधीनगर आणि वडोदरा येथील ८ ठिकाणी कॅनडामधील महाविद्यालयांद्वारे बेकायदेशीर स्थलांतरितांना पाठवणार्‍या दलालांच्या ठिकाणांवर धाडी घातल्या. याविषयी ईडीने सांगितले की, या धाडींमध्ये दिसून आले की, मुंबई आणि नागपूर येथील केवळ २ दलालांनी प्रतिवर्षी जवळपास ३५ सहस्र बेकायदेशीर स्थलांतरितांना परदेशात पाठवले आहे. गुजरातमधील सुमारे १ सहस्र ७०० दलाल आणि भारतभरात सुमारे ३ सहस्र ५०० जणांनी हे जाळे विणले असल्याचेही अन्वेषणात आढळून आले आहे. ईडीचा अंदाज आहे की, ८०० हून अधिक दलालांवर  अनेक यंत्रणांनी कारवाई करूनही अजूनही ते सक्रीय आहेत. (अशांना कठोर शिक्षा न झाल्यामुळेच ते पुन्हा गुन्हेगारी कृत्य करू धजावत आहेत. अशांना आता फाशीचीच शिक्षा द्यायला हवी ! – संपादक)

१. मुंबई आणि नागपूर येथील किमान २ दलालांनी दलालीच्या आधारावर विद्यार्थी पाठवण्यासंबंधी परदेशातील अनेक विद्यापिठे अन् महाविद्यालये यांच्याशी करार केले आहेत. पुढे बेकायदेशीर स्थलांतर करणार्‍यांच्या विद्यार्थी व्हिसासाठी (‘स्टुडंट व्हिसा’साठी) या दलालांकडून आवश्यक कागदपत्रे सिद्ध केली जात असत. ईडीने कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. तसेच आरोपींच्या बँक खात्यातील १९ लाख रुपयेही जप्त केले आहेत.

२. कॅनडामधील किमान २६० महाविद्यालयांनी कॅनडामार्गे अमेरिकेत जाणार्‍या बेकायदेशीर स्थलांतरितांना विद्यार्थी व्हिसा जारी केले. सध्या अशा महाविद्यालयांच्या व्यवहारांची, तसेच त्यांनी स्थलांतरितांकडून किती पैसे घेतले, यासंबंधी अन्वेषण चालू आहे. अमेरिकेत जाण्यासाठी ‘डाँकी रूट’ (अमेरिकेत बेकायदेशीररित्या प्रवेश करण्याच्या भयावह पद्धतीला ‘डाँकी रूट’ म्हटले जाते.) पद्धतीने जाण्यापेक्षा विद्यार्थी व्हिसा काढणे सोयीस्कर वाटणार्‍यांनी प्रत्येकी ५० लाख देऊन तो मिळवल्याचे सांगितले जात आहे. अशा बेकायदेशीर स्थलांतरितांकडून कॅनडामधील महाविद्यालयांनी नेमके किती पैसे घेतले याचादेखील शोध घेतला जात आहे.

३. ईडीने केलेल्या अन्वेषणात भारतियांना बेकायदेशीरपणे अमेरिकेत पाठवण्यासाठी, दलालांनी कॅनडातील महाविद्यालये आणि विद्यापिठांमध्ये त्यांच्या प्रवेशाची व्यवस्था केली अन् त्यांना विद्यार्थी व्हिसावर तेथे पाठवले. एकदा कॅनडामध्ये पोचल्यावर ते महाविद्यालयात रुजू होण्याऐवजी त्यांनी बेकायदेशीरपणे अमेरिका-कॅनडा सीमा ओलांडली.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारचे कृत्य केले जात असतांना भारतीय सुरक्षायंत्रणा आणि गुप्तचर झोपले होते का ? त्यामुळे संबंधित उत्तरदायींवरही कारवाई झाली पाहिजे !