पुणे – मुळा-मुठा नदीमध्ये रसायनमिश्रीत दूषित पाणी आल्याने सहस्रो माशांचा मृत्यू झाला असून नाईक बेट परिसरात मृत माशांचा खच पडला आहे. त्यामुळे या भागात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. याठिकाणी महापालिकेचा नायडू सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पही आहे. महापालिकेने याठिकाणच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेकडे अन्वेषणासाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल २-३ दिवसांत प्राप्त झाल्यानंतर माशांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे ? हे स्पष्ट होईल, असे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले आहे.
१. संगमवाडी येथे मुळा आणि मुठा नद्यांचा संगम होतो. शहरातील मैलामिश्रीत पाणी प्रक्रिया न करता थेट नदीमध्ये सोडले जात असल्याने नदी प्रदूषित झाली आहे.
२. मैलामिश्रीत पाणी नदीमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले आहेत. शहरात दिवसाला ९०० एम्.एल्.डी. सांडपाण्यापैकी केवळ ४५० एम्.एल्.डी. पाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा नदीत सोडले जाते; पण तरीही ४५० एम्.एल्.डी. घाण पाणी थेट नदीत येत आहे.
३. मुठा नदीमध्ये केवळ सांडपाणी येत आहे, तर मुळा नदीमध्ये पिंपरी-चिंचवड भागातील आस्थापनांमधून सोडले जाणारे रसायनमिश्रीत विषारी पाणी प्रक्रिया न करता थेट नदीमध्ये येऊन मिसळत आहे. त्यामुळे या नद्यांमधील पाणी सजिवांसाठी धोकादायक आहे.
संपादकीय भूमिकागणेशोत्सवाच्या वेळी मूर्ती विसर्जनामुळे पाण्याचे प्रदूषण होते, असे म्हणणारे कथित पर्यावरणप्रेमी याविषयी काही बोलणार आहेत का ? |