धारवाड (कर्नाटक) येथे श्रीराम सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

कोरोना नियमांच्या नावाखाली ‘सार्वजनिक गणेशोत्सवा’वरील निर्बंधांना विरोध !

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करतांना (१) श्री. प्रमोद मुतालिक यांच्यासमवेत श्रीराम सेनेचे कार्यकर्ते 

धारवाड (कर्नाटक) – सार्वजनिक ठिकाणी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास प्रशासनाने नकार दिल्याने श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्री गणेशमूर्ती ठेवून आणि तिची पूजा करून आंदोलन करण्यात आले. ‘राज्य सरकार हिंदुविरोधी धोरण अनुसरत आहे. कोरोनाच्या नावाखाली निर्बंध लावणे योग्य नाही. सरकारने सार्वजनिक श्री गणेशमूर्तीच्या स्थापनेला अनुमती द्यावी. अन्यथा आम्ही श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करू, अशी चेतावणी देऊन जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून सरकारला निवेदन देण्यात आले. राज्य सरकारने येत्या गणेशोत्सवासाठी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमावली घोषित केली आहे. त्याचा विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना विरोध करत आहेत. त्याच पार्श्‍वभूमीवर श्रीराम सेनेने हे आंदोलन केले.

१. श्री. प्रमोद मुतालिक या वेळी म्हणाले की, उपाहारगृह, मॉल, चित्रीकरण, चित्रपटगृह आदींना कोरोनाच्या काळात सवलती देण्यात आल्या असतांना सार्वजनिक गणेशोत्सवाला निर्बंध लावणे योग्य नाही. हे निर्बंध शिथिल करण्यात आले नाहीत, तर व्यापार न झाल्याने त्यावर अवलंबून असलेली कुटुंबे आणि सरकारी मिळकती यांवरही परिणाम होईल. कौटुंबिक समाधान, तसेच स्थैर्य प्रदान करण्यात सार्वजनिक गणेशोत्सव महत्त्वाची भूमिका निभावतो. यासमवेतच समाजातील सर्व कार्ये चैतन्याने भारित होतात. कामगार वर्गाला अनुकूलता मिळते आणि पैशाच्या रूपात सरकारचा खजिनाही भरतो.

२. विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. केशव हेगडे म्हणाले की, कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास गतवर्षी अनुमती देण्यात आली होती. भावना न दुखावता परंपरागत सार्वजनिक गणेशोत्सवाला नियमबद्ध रितीने साजरा करण्याची यावर्षीही संधी देण्यात यावी.