मुंबई – मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या अल्प झाली असतांनाही दुकानांवरील निर्बंध न उठवल्यास येत्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधार्यांवर बहिष्कार टाकू, अशी चेतावणी मुंबईतील दुकानदारांच्या संघटनेने दिली आहे. ‘फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन’चे अध्यक्ष विरेन शहा यांनी एका पत्रकाद्वारे ही चेतावणी दिली आहे.
मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या गेले पाच आठवडे अल्प झाली आहे. त्यानुसार मुंबईला पहिल्या किंवा दुसर्या श्रेणीत टाकले पाहिजे. तरीही मुंबईला तिसर्या श्रेणीत ठेवले जात आहे, त्यामुळे दुकानांवर विनाकारण निर्बंध लादले गेले आहेत. परिणामी दुकाने अल्प वेळ चालू ठेवल्याने किमान उत्पन्नही मिळत नाही. दुकानदारांना सरकारने साहाय्य केले नाही. त्यामुळे व्यापारी तीव्र आंदोलन करण्याच्या मनस्थितीत आहेत. उर्वरित देशाप्रमाणे मुंबई-महाराष्ट्रातील निर्बंध उठवावेत, असेही आवाहन ‘फेडरेशन’ने केले आहे.