‘ॲपेक्स हॉस्पिटल’ला अनुमती देणारे आयुक्त नितीन कापडणीस यांच्यावर कारवाई करा ! – भाजपचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन देतांना दीपक माने आणि अन्य

सांगली, २४ जून (वार्ता.) – ८७ रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत असणार्‍या ‘ॲपेक्स हॉस्पिटल’ची कोणतीही कागदपत्रे न घेता, कोणतीही पडताळणी न करता डॉ. महेश जाधव यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात न घेता ‘ॲपेक्स हॉस्पिटल’ला सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी अनुमती दिली. त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूस जेवढे ‘ॲपेक्स हॉस्पिटल’ उत्तरदायी आहे, तेवढेच त्यांना अनुमती देणारे आयुक्त नितीन कापडणीस हेही उत्तरदायी आहेत. आयुक्तांनीच डॉ. महेश जाधव यांना प्रारंभीपासून पाठीशी घातले. त्यामुळे ‘ॲपेक्स हॉस्पिटल’ला अनुमती देणारे आयुक्त नितीन कापडणीस यांच्यावर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन भाजपचे संघटन सरचिटणीस दीपक माने यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना दिले आहे. यावर कोणतीही कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याची चेतावणी या निवेदनात देण्यात आली आहे.