वारंवार अत्यंत संहारक ‘परमाणू’ बॉम्बच्या चाचण्या घेऊन जगाच्या तोंडचे पाणी पळवणारा उत्तर कोरिया त्याच्या कर्माची फळे भोगत आहे. उत्तर कोरियाची सध्या अन्नान्न दशा चालू आहे. अन्नाचा दुष्काळ चालू असून तेथे केळ्यांचे मूल्य भारतीय रुपयांत ३ सहस्र रुपये प्रतिकिलो झाले आहे. तेथील महागाईही वाढली असून केसांना लावायचा शॅम्पू १५ सहस्र रुपये मोजून विकत घ्यावा लागत आहे. तेथील हुकूमशहा किम जोंग उन यांनी ‘परिस्थिती यापेक्षाही वाईट होणार असल्याने जनतेने त्याला सामोरे जाण्याची सिद्धता ठेवावी’, असे आवाहन केले आहे. ‘गेल्या वर्षी आलेली वादळे, पूर यांमुळे कृषी क्षेत्रातील उत्पादन त्याचे लक्ष्य गाठू शकले नाही’, असे किम जोंग उन यांनी स्पष्टीकरण दिले. उत्तर कोरियामध्ये ही परिस्थिती अचानक उद्भवली नाही. वर्ष २०१८-२०१९ मध्येच १३ लाख मेट्रिक टन खाद्यसामुग्रीची कमी त्याला सोसावी लागली होती. हुकूमशहा गरिबी आणि भूकमारी हटवण्यात अयशस्वी ठरले आहेत.
टोकाची भूमिका
जगावर वर्चस्व गाजवण्याची आसुरी महत्त्वाकांक्षा बाळगून केवळ संरक्षणावरच जनतेचे सहस्रो कोटी रुपये व्यय केले, तर काय परिणाम होतात, याचे उदाहरण म्हणजे उत्तर कोरिया ! भारतद्वेषाने पछाडून आतंकवाद्यांना पोसण्यासाठी पाण्यासारखे पैसे व्यय करणारा पाकही त्याच पठडीतील आहे. खाद्यपदार्थ, इंधन आदी अनेक कारणांनी उत्तर कोरिया इतर देशांवर, प्रामुख्याने चीनवर अवलंबून आहे; मात्र कोरोनाच्या कारणाने उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय सीमा गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ बंद ठेवल्या आहेत. कोरोनाच्या आरंभीच्या दिवसांत उत्तर कोरियामध्ये एक व्यापारी कोरोनाबाधित असल्याचे लक्षात आल्यावर किम जोंग उन यांनी त्याला गोळ्या घालून ठार करण्यास सांगितल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. अण्वस्त्र निर्मितीविषयी आडमुठी भूमिका घेतल्यामुळे उत्तर कोरियावर आंतरराष्ट्रीय स्तरावरही काही निर्बंध लादले आहेत. या पार्श्वभूमीवर तेथील स्थिती कशी असेल, याचा अंदाज करता येतो. कोरोनाच्या संदर्भात निर्बंधांचे पालन करणे आवश्यकच आहे; मात्र सारासार विचार न करता टोकाची भूमिका घेणे प्रसंगी किती महागात पडते, तेच हे अन्नसंकट दर्शवते. एवढे असूनही ‘अद्याप उत्तर कोरियामध्ये एकही कोरोना रुग्ण नाही’, असा अहवाल त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेला दिला आहे.
उत्तर कोरियाचा आण्विक शस्त्रास्त्रांच्या संदर्भातील एककलमी कार्यक्रम पाहिला, तर ‘जो देश अण्वस्त्रांवर एवढे पैसे खर्च करतो, तो देश किती संपन्न असेल’, असेच वाटते. प्रत्यक्षात किम जोंग उन यांच्या बड्या घराचा वासा किती पोकळ आहे, ते अशा घटनांतून उघड होते. देश चालवतांना व्यक्तीगत महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून काम करावे लागते. एका व्यक्तीच्या विचारांचा परिणाम सामाजिक स्तरावर कसा होतो, हे तेथे कोसळलेल्या अन्नसंकटातून दिसून येते. इतरांना भयाच्या छायेत ठेवण्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा, हिंसक विचार, टोकाची भूमिका यांमुळे देशातील जनता किम यांच्या धाकात राहिली, तरी निसर्ग किम यांच्या विध्वंसक नेतृत्वासमोर हरलेला नाही. अन्नसंकट ही निसर्गाने उत्तर कोरियाला दिलेली चपराक आहे. ‘१ कोटी उत्तर कोरियन नागरिक (पूर्ण लोकसंख्येच्या ४० टक्के नागरिक) भूकबळीचा सामना करत आहेत’, अशी माहिती संयुक्त राष्ट्राने दिली आहे. गेल्या वर्षी भीषण दुष्काळही पडला होता. या पार्श्वभूमीवर लक्षात घेता येईल की, देशात लोकांना खायला अन्न नसतांना हा हुकूमशहा अण्वस्त्रे निर्माण करून इतरांना घाबरवत होता. अण्वस्त्रांनी इतरांच्या पोटात आग पडत असली, तरी देशवासियांच्या पोटातील आग शमत नाही. त्यासाठी विधायक कार्यच करावे लागते, हे उत्तर कोरियाला आता समजले, तरी बरेच काही साध्य झाल्यासारखे आहे. आता जनता बंदुकीच्या धाकात वावरत असली, तरी खायला अन्न नसतांना किती दिवस शांत बसता येईल ? उत्तर कोरियात उद्या अन्न-पाणी यांवरून अंतर्गत युद्ध प्रारंभ झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. ‘अन्नाच्या कणासाठी, पाण्याच्या थेंबासाठी युद्ध होईल, अशी भाकिते वर्तवली गेल्यावर २१ व्या शतकात हे अशक्य आहे’, असे म्हणून त्याची हेटाळणी केली गेली. आता त्याचे पडसाद दिसून येत आहेत.
पूर्वसिद्धता करा !
जगातील प्रत्येक देश स्वतःची सुरक्षितता आणि शत्रूदेशांवर वर्चस्व प्रस्थापित करणे यांसाठी सहस्रो कोटी रुपयांची तरतूद करत असतो. जशी देशाची सुरक्षितता आणि सार्वभौमता महत्त्वाची असते, तसे देशातील जनतेच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा भागवणे, देशांतर्गत आरोग्य सुविधा उभारणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हेही महत्त्वाचे आहे. संरक्षण आणि अंतर्गत विकास ही देशरूपी रथाची चाके आहेत. एकाच्या बळावर देश पुढे जाऊ शकत नाही. उत्तर कोरियामध्ये अत्यल्प अन्न उत्पादन, ४० टक्के लोकसंख्या भूकबळीची शिकार, त्यातच दुष्काळ अशी अनेक संकटे ओढवली आहेत. उत्तर कोरिया जात्यात, तर अन्य देश सुपात आहेत. पाकसारख्या देशाने तर भारतातील कोरोनाच्या संकटाच्या नावाखाली निधी गोळा करून त्याचा परस्पर वापर केल्याचेही उघड झाले आहे.
‘येत्या काळात जगावर अनेक संकटे ओढवतील’, हे द्रष्ट्यांनी सांगितले आहे. गेली काही वर्षे भारतातही वादळे, अवेळी पडणारा पाऊस, पूरस्थिती यांमुळे शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकलेले नाहीत. आपल्याकडील धान्य कोठारांतील कितीतरी टन धान्य सडून, उंदरांनी खाऊन नष्ट झाल्याच्या बातम्या प्रतिवर्षी येतात. यंदाही पावसाच्या आरंभी अनेक धरणे भरलेली आहेत. नद्यांचे पाणी गावागावांत शिरले आहे. अशा स्थितीत या संकटांना सामोरे जाण्यासाठी भारत किती सज्ज आहे, हे पाहून त्याप्रमाणे पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे !