इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानने २४ डिसेंबरच्या रात्री अफगाणिस्तानच्या पक्तिका आणि खोस्त प्रांतात केलेल्या हवाई आक्रमणात आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यू झाला, तर जवळपास १५० जण घायाळ झाले. पाकच्या लढाऊ विमानांनी मुरघा आणि लमान भागांतील तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या आतंकवादी संघटनेच्या ठिकाणांवर बाँब फेकले. ‘पाकिस्तानच्या या भ्याड कृत्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल’, असे अफगाण तालिबानचा प्रवक्ता जैबुल्ला मुजाहिद याने म्हटले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार अफगाण तालिबानच्या सुमारे १५ सहस्र सैनिकांनी काबुल, कंदाहार आणि हेरात येथून पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामधील मीर अली सीमेवर पोचण्यास चालू केले आहे. यामुळे पाकिस्ताननेही सैनिकी सिद्धता ठेवली आहे.