अवास्तव देयके आकारून कोरानाबाधितांची लूट करणार्‍या डॉक्टरांच्या विरोधात लेखी तक्रारी करा ! – परशुराम उपरकर, सरचिटणीस, मनसे

जनतेच्या परिस्थितीचा अपलाभ उठवून लूटमार करणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात खासगी कोविड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची लूटमार करण्यात आली आहे. कणकवली बिल नियंत्रण समितीकडून २ खासगी कोविड केअर सेंटरच्या व्यवस्थापनाला नोटीस बजावण्यात आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यातील अन्य कोविड सेंटरची चौकशी व्हावी. काही कोविड सेंटरमध्ये रुग्णांकडून लाखो रुपयांची देयके रोख स्वरूपात घेऊन लूटमार केलेली आहे. अशा प्रकारांना बळी पडलेल्या कोरोनाबाधित रुग्णांनी तालुका नियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा नायब तहसीलदार यांच्याकडे रितसर लेखी तक्रारी कराव्यात. मनसे त्यांच्या पाठीशी राहील, असे आवाहन मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे.

(देशाच्या स्वातंत्र्यानंतर केवळ विकासावर भर देण्यात आला. विकासाबरोबर समाजाला नीतीमत्तेचे शिक्षण दिले गेले नाही. त्यामुळे आज समाजात भ्रष्टाचार, अनैतिकता, अनाचार वाढला आहे. याचा परिणाम म्हणून आज पैसा आणि संपत्ती गोळा करण्याची वृत्ती वाढली. सध्याच्या कोरोना महामारीत जनता भरडली जात असतांना कोरोनाबाधित रुग्णांची लूटमार होणे हा ‘मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा’च प्रकार होय ! – संपादक)

कोरोनाबाधित रुग्ण कोविड सेंटरमध्ये भरती झाल्यानंतर शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे देयक आकारणे आवश्यक आहे. अनेक रुग्णांकडून बाहेरून तपासण्या करून घेण्यात आल्या. त्याचेही पैसे आकारण्यात आले आहेत, तसेच औषधांचे पैसे वेगळ्या प्रकारे दाखवण्यात आले आहेत. दोन ते अडीच लाख रुपयांपर्यंत देयके देऊन  कोरोनाबाधित रुग्णांना कर्जाच्या खाईत लोटण्याचे काम काही खासगी डॉक्टरांनी केले आहे. याविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार ‘बिल नियंत्रण समिती’च्या वतीने देयकांची तपासणी केली जात आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार उपरकर यांनी केली आहे.