श्री. यज्ञेश सावंत यांना मुंबई येथे वार्ताहर सेवा करतांना आलेले वाईट अनुभव

१. भ्रष्टाचार निवारण समितीच्या प्रमुखाने बातमी लावण्यासाठी लाच देऊ करणे आणि ‘लाच देणे’, म्हणजे काय ?’, हे या प्रसंगातून लक्षात येणे

श्री. यज्ञेश सावंत

‘वर्ष १९९८ मध्ये माझे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. त्या पुढील वर्षी, म्हणजे वर्ष १९९९ मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’चा प्रारंभ झाल्यावर मला वार्ताहर सेवेची संधी मिळाली. मी वार्ताहर सेवा चालू केल्यानंतर काही संस्था आणि संघटना यांना स्वतःहून संपर्क करायला प्रारंभ केला होता. एका ठिकाणच्या भ्रष्टाचार निवारण समितीलाही मी संपर्क केला होता. माझ्या शाळेत जाण्याच्या मार्गावर हा फलक असल्याने मी नेहमी हा फलक वाचायचो. ‘ही समिती भ्रष्टाचार निवारण, म्हणजे नेमके काय करते ?’, हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या प्रमुखांना भेटायला गेलो. ते हिंदी भाषिक होते. त्यांनी ते काम करत असलेल्या २ – ३ प्रकरणांविषयी मला सांगितले. मी त्या प्रकरणांविषयी समजून घेतले. त्या वेळी त्यांच्याशी झालेले संभाषण पुढे देत आहे

भ्रष्टाचार निवारण समितीचे प्रमुख : बातमी लावणार का ?
मी : प्रथम प्रकरण वाचतो. संपादकीय विभागात विचारतो आणि नंतर लावण्याचे पाहूया. (त्यांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केल्यावर मी हस्तांदोलन केले आणि हात मागे घेतल्यावर मला माझ्या हातावर १०० रुपयांची नोट आढळली.)
मी : हे काय ?
भ्रष्टाचार निवारण समितीचे प्रमुख : असू द्या. (मी नोट त्यांच्या पटलावर ठेवल्यावर ते ती बळच माझ्या हातावर ठेवत होते.) बातमी लावाच.
मी : आम्हाला पैसे नकोत. आम्ही प्रकरण पाहून बातमी लावू. (मी तेथून बाहेर पडलो.)
​‘लाच देणे कसे असते ?’, हे भ्रष्टाचार निवारण समितीच्या प्रसंगात पहिल्यांदा माझ्या लक्षात आले आणि ‘हे कशा प्रकारे भ्रष्टाचार निवारणाचे काम करत असतील ?’, याची मला कल्पना आली.

२. हिंदी भाषिक पत्रकारांनी स्वार्थी हेतूने प्रतिष्ठितांशी ओळख करून देणे, त्यांच्यापासून दूर रहाणे, त्यांनी दूरभाष करून बोलावणे; परंतु वार्ताहर सहसाधक मिळाल्याने या पत्रकारांपासून कायमचे दूर होता येणे

​‘मुंबईच्या उपनगरांमध्ये वार्ताहराची सेवा करण्यास प्रारंभ केल्यावर तेथे मराठी भाषिकांपेक्षा हिंदी भाषिक पत्रकार अधिक आहेत’, असे माझ्या लक्षात आले. या हिंदी भाषिक पत्रकारांपैकी १ – २ पत्रकारांनी माझ्याशी ओळख करून घेतली. तेव्हा मी वयाने लहान असलो, तरी माझी उंची अधिक असल्याने ते मला त्यांच्या वयाचेच समजायचे. हे हिंदी भाषिक पत्रकार माझी विविध राजकीय पक्षांचे स्थानिक नेते, प्रतिष्ठित व्यक्ती यांची भेट घालून त्यांच्याशी ओळख करून द्यायचे. मला प्रथम ‘ते माझी स्वतःहून ओळख करून देत आहेत, तर चांगले आहे. त्या निमित्ताने संपर्क वाढतो’, असे वाटायचे. नंतर हिंदी भाषिक पत्रकारांमध्ये ‘कुणाकडून काय मिळवता येईल ?’, याविषयीची अधिक चर्चा असायची आणि ते मलाही त्यासाठी उद्युक्त करायचे. त्यातून ‘अधिक जणांनी काही मागणी केल्यास संबंधित त्यांना ‘नाही’ म्हणणार नाही’, असा सुप्त हेतू होता. हे काही दिवसांनंतर माझ्या लक्षात आल्यावर मी त्यांच्यापासून दूर राहू लागलो. नंतर मला ते स्वतःहून दूरभाष करून बोलवायचे; मात्र पुढे मला वार्ताहर सहसाधक मिळाल्याने मला या पत्रकारांपासून कायमचे दूर होता आले.

३. एका बाजारपेठेतील फसवणुकीच्या प्रसंगाला धैर्याने सामोरे जाता येऊन पैसे परत मिळवता येणे

३ अ. महाविद्यालयात प्राध्यापक न आल्याने वर्ग होणार नसणे, त्यामुळे बाजारपेठेत जाण्याचे ठरवणे, काही कारणाने तिथे एकट्यानेच जाणे अन् पुष्कळ गर्दी असलेल्या ठिकाणी काही लोक आरडाओरडा करत काहीतरी व्यवहार करतांना दिसणे : माझे वार्ताहर सेवेसमवेत महाविद्यालयीन शिक्षण चालू होते. वर्ष १९९९ मध्येच एकदा महाविद्यालयाचे प्राध्यापक न आल्याने वर्ग होणार नव्हते. तेव्हा मित्रांकडून एका बाजारपेठेविषयी ऐकले होते. त्या दिवशी वेळ मिळाल्याने मी तेथे जायचे ठरवले. मित्रांचे काही कारणाने तेथे येणे रहित झाले. त्यामुळे मी एकटाच तेथे गेलो. तेथे दोन-तीन कक्ष पाहिल्यावर एका कक्षावर पुष्कळ गर्दी असल्याने मी ‘नेमके काय आहे ?’, हे पहाण्यासाठी तेथील गर्दीतून डोकावले. तेथे लोक आरडाओरडा करत काहीतरी व्यवहार करत होते.

३ आ. गर्दीतील एकाने खांद्यावर हात ठेवणे, दुसर्‍याने ओरडून पैसे देण्यास सांगणे आणि एकाने पटलावर सोंगट्या फेकून पैसे गेल्याचे सांगणे, नंतर एका व्यक्तीने घरी जाण्यास सांगितल्यावर या घटनेची बातमी बनवून देणार असल्याचे सांगताच त्याने अपशब्द उच्चारून मारहाणीची धमकी देणे : मी तेथे डोकावल्यावर गर्दीतील एकाने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि दुसर्‍याने कानात जोरात ओरडत ‘अमुक रक्कम दे’, असे सांगितले. मी तेवढी रक्कम खिशातून काढली आणि ‘वस्तू काय देत आहेत ?’, हे नेमके जाणून न घेता ते पैसे विक्रीसाठी बसलेल्या माणसाकडे दिले. तेथील साहित्याला खेटून एका पटलावर त्यांनी काहीतरी सोंगट्या फेकल्या आणि मला सांगितले, ‘‘तुझे पैसे गेले.’’ मला काही मिनिटे नेमकी ‘काय प्रक्रिया होत आहे ?’, हे लक्षात येईना. तेवढ्यात तेथून जाणार्‍या एका व्यक्तीने मला बाहेर खेचले आणि तेथून बळच रेल्वेस्थानकाच्या दिशेने नेले. ती व्यक्ती म्हणाली, ‘‘यांच्या नादाला लागू नको. ही वाईट माणसे आहेत. जुगारी आहेत. पैसे विसर. तू इथून सरळ घरी जा. घरी कळले, तर तुला सर्व रागावतील.’’ तेव्हा मी त्यांना ‘मी तर पैसे घेऊनच जाईन. ते लोकांना फसवत आहेत. मी पत्रकार आहे. याची सर्व बातमी बनवूनच देतो’, असे सांगितले. तेव्हा ती व्यक्ती मला अपशब्द बोलू लागली आणि ओळखपत्र दाखवण्याचा आग्रह करू लागली. नंतर ती ‘मारहाण करू’, अशी धमकी देऊन निघून गेली.

३ इ. ते लोक अनेक जणांना फसवत असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांच्या माध्यमातून कृती करण्याचे ठरवणे आणि पोलिसांनी प्रसंग जाणून घेऊन ते सहकार्‍यांसह बाजारपेठेत पोचणे : घडलेल्या घटनेचा मला आता पुरता अंदाज आला होता. तेथे ये-जा करणार्‍या अन्य लोकांनाही ते फसवत असल्याचे लक्षात आले. ‘त्यामुळे ते रोखले पाहिजे, तसेच पैसे परत मिळवले पाहिजे’, या विचाराने मी काहीतरी कृती करण्याचे ठरवले. दैनिक कार्यालयात मी घडलेल्या प्रसंगाची कल्पना दिली. तेथून तत्कालीन संपादकीय विभागातील साधकांनी ‘यामागे मोठी टोळी असणार’, असे सांगून सावधगिरीने वागण्याची सूचना केली. ‘नेमके काय करता येईल ?’, याचा विचार करतांना ‘प्रथम पोलिसांच्या माध्यमातून काही होते का ?’, हे पाहूया’, या विचाराने आझाद मैदानाजवळील पोलीस ठाण्याचा पत्ता मी मैदानाला खेटून असलेल्या चहाच्या मोठ्या टपरीवाल्याला विचारला. त्याने ‘कशासाठी पोलीस हवेत ?’, असे विचारले. तेव्हा मी त्याला थोडक्यात प्रसंग सांगू लागलो. काही वाक्ये ऐकल्यावर त्याने मागे वळून एका पटलाजवळ बसलेल्या लोकांकडे वळत ‘साहेब, ती माणसे आली’, असे सांगितले. तेव्हा त्यांनी मला आत पाठवून देण्यास सांगितले. मी त्यांच्या जवळ गेल्यावर तेथे ३ पोलीस चहा पित बसल्याचे मला दिसले. त्यांच्यापैकी एका पोलिसाने प्रसंग जाणून घेतला आणि ‘काहीतरी करू’, असे म्हणून ते सहकार्‍यांसह त्या बाजारपेठेत पोचले.

३ ई. पोलिसांनी टोळीच्या म्होरक्याला दरडावून पैसे देण्यास सांगणे आणि त्यांनी पैसे दिल्यावर पोलिसांनी मार्ग दाखवून जाण्यास सांगणे अन् देवाच्या कृपेने सर्व पैसे मिळवून सुखरूप घरी पोचणे : एक पोलीस संबंधित कक्षापासून अनुमाने १०० मीटर अंतरावर उभा राहिला. त्यांना ‘मी आपण पुढे जाऊया’, असे सांगितल्यावर त्यांनी ‘थांब येथेच’, असे सांगितले. उर्वरित दोन पोलीस कक्षाच्या ठिकाणी गेल्यावर ५ मिनिटांनी त्या कक्षाचा, म्हणजेच फसवणूक करणार्‍या टोळीचा दाक्षिणात्य म्होरक्या हातात नोटा घेऊन आणि गयावया करत आम्ही जेथे उभे होतो, तेथे आला. मी कक्षाच्या ठिकाणी पाहिले, तर आसपासही वस्तूंचे बनावट कक्ष लावलेल्या टोळीतील सर्वच लोक उभे राहिले. ते अनुमाने २५ ते ३० जण होते आणि वस्तू विक्रीला बसण्याच्या नावाखाली लोकांना फसवत होते. पोलिसांनी टोळीच्या म्होरक्याला दरडावून ‘याचे पैसे परत दे’, असे सांगितले आणि ‘येथे पुन्हा दिसलास, तर बघ’, अशी तंबी दिली. त्याच्या हातात पुष्कळ पैसे होते. ते सर्वच त्याने माझ्यापुढे केले. मी त्यांतील माझी रक्कम घेतली. पोलिसांनी ‘तू सांगितल्यामुळे आम्हाला कारवाई करता आली. लोक सांगत नाहीत’, असे सांगितले. टोळीतील सदस्यांची एवढी संख्या पाहून ‘मला मारहाण होईल’, अशी भीती मी पोलिसांना बोलून दाखवली. त्यांनी ‘काळजी करू नको. आम्ही इथेच आहोत’, असे म्हणत रेल्वेस्थानकाकडे जाण्याचा अन्य एक मार्ग दाखवून तेथून जाण्यास सांगितले. देवाच्या कृपेने सर्व पैसे परत मिळवून मी सुखरूप घरी पोचलो.’

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.३.२०२०)​