कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करणार्‍या ठेकेदाराकडून होणार्‍या लुबाडणुकीची चौकशी करा !

मनसेचे नेते परशुराम उपरकर यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

अशी मागणी का करावी लागते ? हे प्रशासनाच्या का लक्षात येत नाही ?

सिंधुदुर्ग – कोरोनाच्या प्रारंभीच्या काळात ओरोस येथील जिल्हा रुग्णालयातील मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ओरोस प्राधिकरणामध्ये भूमी देऊन अंत्यसंस्कार करण्याचा ठेका ठेकेदाराला देण्यात आला होता. शासनाकडून पैसे मिळत असूनही हा ठेकेदार कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांकडूनही पैसे घेत असल्याच्या तकारी आहेत. त्यामुळे जनतेची लुबाडणूक करणार्‍या ठेकेदाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.

या निवेदनात उपरकर यांनी म्हटले आहे की,

१. कोरोनाच्या प्रारंभीच्या काळात मृतदेह जाळण्याकरिता ठेकेदाराला १५ सहस्र रुपये आणि आता १० सहस्र रुपये दिले जात असल्याचे समजते.

२. या ठेकेदाराला कोरोनाबाधितांचे मृतदेह जाळण्यासाठी शासन पैसे देत आहे; परंतु याची कल्पना कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना नसते. त्यामुळे या ठेकेदाराने रुग्णाच्या कुटुंबियांकडून १० ते १५ सहस्र रुपये मागणी केल्याचे सांगितले जात आहे. अशाप्रकारे ठेकेदाराने लुबाडलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी मनसेचे पदाधिकारी अथवा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करावी.

३. या ठेकेदाराने एकाच सरणावर (चितेवर) २ ते ३ मृतदेह एकाच वेळी जाळले आहेत, तसेच अर्धवट जळलेले मृतदेह नंतर पेट्रोल, डिजेल टाकून ते जाळले आहेत, अशा अनेक तक्रारी मनसेकडे आल्या आहेत.

४. यामध्ये लोकांच्या भावनाही दुखावल्या आहेत. मृत व्यक्तीच्या अस्थी मिळण्यासाठीही नातेवाइकांकडून या ठेकेदाराने पैसे उकळले आहेत. एकाच सरणावर २ ते ३ प्रेते जाळल्यामुळे कोणाच्या अस्थी कोणाकडे गेल्या, हेही समजू शकणार नाही.