विधवा महिलेचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलीस अधिकार्‍याला रंगेहाथ अटक  

रक्षक नव्हे, भक्षक झालेल्या अशा पोलिसांना आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा केली पाहिजे !

भटिंडा (पंजाब) – येथे विधवा महिलेचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरविंदर सिंह या साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला गावकर्‍यांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. पोलिसांनी गुरविंदर याला पोलीस सेवेतून बडतर्फ केले आहे. त्याला अटक करून कोठडीत ठेवण्यात आल्यावर त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.

गुरविंदर याने अफूच्या तस्करीचा खोटा गुन्हा नोंदवून या विधवेच्या २० वर्षांच्या मुलाला अटक केली होती. मुलाला सोडण्याच्या बदल्यात गुरविंदर याने विधवा महिलेकडे २ लाख रुपयांची मागणी केली. एकदा तर गुरविंदरने त्या महिलेच्या थेट घरी जावून मुलाच्या उपचारासाठी जमा केलेले ६० सहस्र रुपये काढून घेतले. या महिलेने १ लाख रुपयांची जुळवाजुळव करून गुरविंदर याला दिले; तरीही त्याने मुलाला सोडले नाही, उलट  महिलेकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. याची माहिती या महिलेने गावकर्‍यांना दिली. गावकर्‍यांनी सापळा रचून गुरविंदर संबंधित महिलेच्या घरी आला असता त्याला रंगेहाथ पकडले.