विनामूल्य भरपूर ऑक्सिजन आणि पर्यावरण संरक्षण यांसाठी भारतीय झाडे लावा !

पिंपळाचे झाड

सध्या विविध ठिकाणी ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांचे मृत्यू होत आहेत. त्यामुळे ऑक्सिजनची मानवाला किती आवश्यकता आहे आणि त्याचे मूल्य, हेच यातून दिसून येते. भविष्यात विनामूल्य भरपूर ऑक्सिजन आणि पर्यावरण संरक्षणासाठी आता चळवळ उभारण्याची आवश्यकता आहे.

पुराणात एक अद्भुत श्‍लोक आहे

अश्‍वत्थमेकं पिचुमन्दमेकं न्यग्रोधमेकं दश चिञ्चिणीकाः ।
कपित्थबिल्वामलकत्रयं च पञ्चाम्रनाली नरकं न पश्येत् ॥

-स्कन्दपुराण, खण्ड ६, अध्याय २५२, श्‍लोक ४९

अर्थ : पिंपळ, कडुनिंब आणि वडाचे प्रत्येकी एक झाड, चिंचेची १० झाडे, तसेच कवठ, बेल, आवळा यांची ३ झाडे आणि आंब्याची ५ झाडे लावणार्‍याला कधीही नरकाचे दर्शन होणार नाही.

सध्या वरील श्‍लोकानुसार आचरण न केल्यामुळे आपल्याला दुष्काळ स्वरूपात नरकाचे दर्शन घडते आहे. अजूनही वेळ गेलेली नसून आताही चूक सुधारता येईल. गुलमोहर, नीलगिरी आणि सुबाभूळ ही झाडे आपल्या देशातील पर्यावरणाला घातक आहेत. तरी पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करून पर्यावरणाविषयीही ज्या चुका झाल्या, त्या वड, पिंपळ, आंबा आणि चिंच आदी झाडे लावून पुढच्या पिढीला निरोगी अन् सुजलाम् सुफलाम् पर्यावरण देण्याचा प्रयत्न करूया.

दुष्काळाचे खरे कारण

पिंपळ, वड आणि लिंब ही झाडे लावणे बंद केल्याने हानी होत आहे, हे वाचून आपल्याला विचित्र वाटेल; परंतु हे सत्य आहे. पिंपळ कार्बन डायऑक्साइड १०० टक्के शोषून घेतो, तर वड ८० टक्के आणि नीम ७५ टक्के शोषतो अन् ही झाडे परिसराला थंड हवामान, तसेच ऑक्सिजन देऊन नैसर्गिक ताजेतवाने करण्याचे काम करतात. याउलट देशात ‘यूकेलिप्टस’ची (नीलगिरीची) झाडे लावण्यास प्रारंभ केला. हे झाड फार पटकन वाढते. मुख्य म्हणजे दलदलीची जमीन कोरडी करण्यासाठी हे झाड लावले जाते. ज्यामुळे जमीन जलविहीन होते. गेल्या ४० वर्षांपासून हे वृक्ष सर्व महामार्गांवर दुतर्फा लावले गेले आहेत. त्यामुळे नैसर्गिक ताजेतवाने न राहिल्याने उष्णता वाढून वेगाने पाण्याची वाफ होत आहे.

प्रदूषणमुक्त भारतासाठी पिंपळ आणि वड यांची लागवड करणे आवश्यक !

पिंपळाला झाडांचा राजा म्हणतात. त्याच्या स्तुतीमध्ये एक श्‍लोक आहे

मूले ब्रह्मा त्वचि विष्णु शाखायां शङ्कर एव च ।
पत्रे पत्रे सर्वदेवाः वृक्षराज नमोस्तुते ॥

अर्थ : ज्याच्या मुळाशी ब्रह्मदेव, त्वचेमध्ये (खोडामध्ये) श्रीविष्णु, फांद्यांमध्ये भगवान शिव आणि प्रत्येक पानात सर्व देवतांचा वास आहे, अशा वृक्षराजाला (पिंपळाला) नमस्कार असो.

येत्या काही वर्षांत प्रत्येक ५०० मीटर अंतरावर पिंपळ, नीम आणि वडाचे झाड लावले, तर प्रदूषणमुक्त भारत होईल. ज्यांच्या बाजूला जागा असेल, त्यांनी तुळस लावावी. आपण सर्वांनी एकत्रितपणे आपल्या भारताला नैसर्गिक आपत्तीतून वाचवूया.

(संदर्भ : व्हॉट्सअ‍ॅप)