शासनाने यावर लवकरात लवकर उपाय काढून थकित रक्कम रुग्णालयांना द्यावी !
कोल्हापूर – एकत्रित महात्मा जोतिबा फुले आणि पंतप्रधान जन आरोग्य योजना जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांना लाभदायक ठरत आहेत. या योजनेतून ४ शासकीय आणि १६ खासगी, अशा एकूण २० रुग्णालयांत १ ते १५ एप्रिल अखेर १ सहस्र ३९० विद्यार्थ्यांवर उपचार झाले असून रुग्णालयांना २७ कोटी ८० सहस्र रुपयांचा परतावा मिळाला आहे. अद्यापही २० रुग्णालयातील सव्वादोन कोटी रुपये शासनाकडे थकित आहेत. ही रक्कम लवकर मिळाल्यास पुढील बाधितांवर पुढील उपचार करणे सोयीचे होईल, असे रुग्णालयांच्या वतीने सांगण्यात आले.
रुग्णांच्या नातेवाइकांना योजनेची माहिती देण्यासाठी रुग्णालयात आरोग्य मित्र आहेत. त्यांच्याकडे संबंधित रुग्णाचा कोरोना अहवाल, शिधापत्रिका, आधार कार्ड देऊन योजनेतून उपचार घेणार असल्याची माहिती द्यावी लागते. या योजनेमुळे नातेवाइकांची आर्थिक ओढाताण होत नाही. या एकत्रित आरोग्य योजनेतून कोरोनाबाधितांवर जिल्ह्यातील रुग्णालयांत उपचार चालू आहेत; मात्र त्यांच्यावर वैद्यकीय उपचारासाठी आलेला व्यय रुग्णालयांना वेळेत मिळत नसल्याने योजनेतील रुग्णालय प्रशासनातून तीव्र नापसंती व्यक्त करण्यात येत आहे.