मुख्यमंत्र्यांनी अत्यंत तुटपुंजी तरतूद करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली ! – चंद्रकांत पाटील, भाजप

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोल्हापूर, १५ एप्रिल – राज्यात निर्बंधांची घोषणा करतांना मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेला मोठे साहाय्य केल्याचे दाखवत शब्दांचे खेळ केले; पण त्यांनी केलेल्या घोषणा फसव्या आहेत. गरीब गरजू वर्गाला साहाय्य केल्याचा आव आणला असला तरी प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून जनतेच्या तोंडाला त्यांनी पाने पुसली आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, ‘‘रिक्शाचालक प्रत्येक मासात १० सहस्र रुपये कमवतात आणि त्यांना केवळ दीड सहस्र रुपये देऊन त्यांच्याही तोंडाला पाने पुसली आहेत. राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्याचा आदेश असल्याने त्याचा मोठा फटका व्यापार्‍यांना बसणार आहे. वास्तविक पुरेशी काळजी घेऊन व्यापार्‍यांना काम करण्याची अनुमती द्यायला हवी होती. केवळ निर्बंध लादायचे आणि फारसे साहाय्यही करायचे नाही, अशा धोरणामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची भीती आहे.’’