येत्या ४ आठवड्यांत जागतिक महायुद्धाला प्रारंभ होईल ! – रशियातील संरक्षणतज्ञाचा दावा

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाचे महायुद्धात रूपांतर होण्याची शक्यता !

मॉस्को (रशिया) – येत्या ४ आठवड्यांत म्हणजे मासाभरात जागतिक युद्धाला प्रारंभ होऊ शकतो, असा दावा रशियाचे संरक्षणतज्ञ पावेल फेलगेनहॉर यांनी केला आहे. रशियाच्या सैनिकांनी मोठ्या प्रमाणात दारुगोळ्यासह युक्रेनच्या पूर्व भागातील सीमेकडे कूच केल्याच्या घटनेचा अभ्यास केल्यानंतर पावेल फेलगेनहॉर यांनी हा दावा केला आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचे महायुद्धात रूपांतर होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. (जागतिक महायुद्धाची शक्यता लक्षात घेता भारतानेही आतापासूनच संरक्षणासाठी योग्य ती पावले उचलायला हवीत ! – संपादक)

पावेल फेलगेनहॉर यांनी म्हटले की, सध्या चालू असलेल्या रशिया आणि युक्रेन या दोन देशांमधील तणावामुळे युरोपमध्ये युद्ध होण्याची शक्यता बळावते आहे. पश्‍चिमेकडील देशांना याविषयी काय करायचे, हेच ठाऊक  नाही. या परिस्थितीमध्ये अमेरिकेने युक्रेनला साहाय्य करण्याचे अश्‍वासन दिले आहे.