कोल्हापूर, १९ मार्च (वार्ता.) – कोल्हापूर महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री महालक्ष्मी मंदिर, श्री सिद्धिविनायक मंदिर (ओढ्यावरील गणपति), बागल चौक येथील पंचमुखी मारुति मंदिर, टेंबलाईवाडी येथील त्र्यंबोली देवस्थान, बालिंगा येथील कात्यायनी देवी ही मंदिरे १९ मार्चपासून सकाळी ७ ते सायंकाळी ६ असे एकसलग दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली आहेत. सायंकाळी ६ नंतर दर्शन बंद करण्यात येणार आहे. दर्शनास येतांना ‘मास्क’ घालणे बंधनकारक असून भाविकांनी सुरक्षित अंतर ठेवून रांगेतून दर्शन घ्यावे. भाविकांनी सायंकाळी ६ नंतर मंदिर आणि मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव विजय पोवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.