राहुल गांधी यांनी चुकीविषयी क्षमा मागितली, ही चांगली गोष्ट आहे; मात्र काँग्रेसने केलेल्या चुकीविषयी जर खरोखरच त्यांना पश्चात्ताप वाटत असेल, तर त्यासाठी काँग्रेस काय प्रायश्चित्त घेणार ? हेही त्यांनी सांगणे अपेक्षित आहे. आणीबाणीमध्ये देशाची अतोनात हानी झाली, अनेकांचे प्राण गेले, यांविषयी प्रायश्चित्त न घेता मागितलेल्या क्षमेला काय अर्थ आहे ?
मुंबई, ५ मार्च (वार्ता.) – आणीबाणीविषयी देशवासियांची क्षमा मागणे, हा गांधीविचार आहे, नथुराम गोडसे याचा विचार नाही. आणीबाणीमध्ये ज्यांना त्रास सहन करावा लागला, त्याविषयी राहुल गांधी यांनी क्षमा मागितली; पण देशामध्ये जो कलंक आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्याची चर्चा झाली, त्या गोध्रा हत्याकांडाप्रकरणी नरेंद्र मोदी क्षमा मागतील का ? असा प्रश्न काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना त्यांनी देशात लागू केलेल्या आणीबाणीविषयी राहुल गांधी यांनी क्षमा मागितली. याविषयी ३ मार्च या दिवशी विधीमंडळाच्या परिसरात पत्रकारांनी मत विचारले असता नाना पटोले यांनी वरील वक्तव्य केले.
या वेळी नाना पटोले म्हणाले की,
१. काँग्रेस हा असा पक्ष आहे की, जो राजकारण अल्प आणि देशाच्या हिताचा विचार अधिक करतो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्हे, तर देशात शांतीचे वातावरण टिकून रहावे, यासाठी राहुल गांधी यांनी क्षमा मागितली.
२. विधानसभा अध्यक्षांची निवड होण्याविषयी ते म्हणाले, ‘‘अध्यक्षांची निवडणूक झाली पाहिजे, अशी काँग्रेसची भूमिका आहे; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभागृहात किती सदस्य उपस्थित राहू शकतील ?, याचा अभ्यास करून पुढील आठवड्यात याविषयीचे धोरण निश्चित केले जाईल.’’