पुणे येथील ७५ टक्के मुले-मुली सोळाव्या वर्षाआधीच ‘रिलेशनशिप’मध्ये

उदात्त हिंदु संस्कृतीला झिडकारून पाश्‍चात्त्य संस्कृती आचरण्याचा परिणाम !

पुणे – शहरातील अनेक अविवाहित युवक-युवतींनी सोळाव्या वर्षापूर्वीच ‘रिलेशनशिप’मध्ये अडकल्याची संमती दिली आहे. सोळाव्या वर्षापूर्वी सरासरी ७५ टक्क्यांहून अधिक मुले-मुली एका तरी ‘रिलेशनशिप’मध्ये गुंतल्याचे ‘प्रयास’ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

‘प्रयास’ संस्थेचे संचालक डॉ. विनय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तृप्ती दरक, डॉ. शिरीष दरक आणि रितू पराजंपे यांनी सर्वेक्षणासाठी अनुमाने १ सहस्र २४० तरुणांशी संवाद साधला. त्यात ६८० तरुण, तर ५८५ तरुणी यांचा समावेश होता. यापैकी ६० टक्के तरुण-तरुणींनी ‘सीरियस रिलेशनशिप’वर विश्‍वास ठेवत असल्याचे नमूद केले. जन्मापासून पुणे शहरात वाढलेली तरुण पिढी किंवा वर्ष १९९५ नंतर जन्मलेल्या आणि पुण्यात आलेल्या तरुण-तरुणींनी सोळाव्या वर्षी अथवा त्यापूर्वीच एका ‘रिलेशनशिप’मध्ये अडकल्याचे मान्य केल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. अनुमाने ८० टक्के मुले-मुली किमान एका ‘रिलेशनशिप’मध्ये होती. (‘लिव्ह इन रिलेशनशिप’ सारख्या गोष्टींना शासनकर्त्यांनी मान्यता दिल्याने जनतेचे चारित्र्य नष्ट होत आहे. हिंदु संस्कृतीपासून दूर जाऊन पाश्‍चात्त्य संस्कृतीशी जवळीक साधल्यामुळे त्याचे समाजात घडणारे दुष्परिणाम पुनःपुन्हा पुढे येऊ लागले आहेत. – संपादक)