पुणे जिल्हा परिषदेचा २९२ कोटी रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प

पुणे – पुणे जिल्हा परिषदेचा २९२ कोटी ७५ लाख रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प मुख्य वित्त लेखा अधिकारी विशाल पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासक गजानन पाटील यांच्याकडे सादर केला. प्रशासक गजानन पाटील यांनी जिल्हा परिषदेसमोर मांडलेल्या अर्थसंकल्पाला संमती दिली. थकीत पाणीपट्टीपोटी मिळणार्‍या रकमेमुळे या वर्षीच्या अर्थसंकल्पात ५८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या अर्थसंकल्पामध्ये समाजकल्याण विभाग २४ कोटी २६ लाख रुपयांची, दिव्यांग विभागासाठी ८ कोटी, महिला आणि बालकल्याण विभागासाठी १२ कोटी १३ लाख, शिक्षण विभागासाठी १४ कोटी रुपयांचे प्रावधना केले आहे. ४५ सहस्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक लाभ योजनेतून लाभ मिळणार आहे.

शाळा सुधारणा, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सक्षमीकरण, अंगणवाड्यांसाठी सोलर पॅनेल, लघु पाटबंधारे, फेलोशिप योजना आदींचा अर्थसंकल्पात समावेश केला. गेल्या वर्षी २२३ समाजमंदिरांचे ग्रंथालयात रूपांतर केले आहे. यावर्षी ४५० समाजमंदिरांचे ग्रंथालयात रूपांतर करण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील ३०३ शाळांचे मॉडेल स्कूलमध्ये (आदर्श शाळा) रूपांतर करायचे आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शिस्त यांसाठी सीसीटीव्ही बसवणे यांसारख्या गोष्टींना प्राधान्य देण्यात आले आहे.