कोयता गँग अस्तित्वात नाही ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

गुंड (भाई) होण्याच्या आकर्षणामुळे अल्पवयीन मुलांकडून कोयत्याचा वापर !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे – शहरात कोणतीही कोयता गँग अथवा कोयत्याचा वापर करून संघटित गुन्हेगारी करणारी टोळी अस्तित्वात नाही. गुंड (भाई) होण्याच्या आकर्षणामुळे अल्पवयीन मुले कोयत्याचा वापर करून दहशत माजवत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. पुणे येथील कोयता गँगने लोहगाव परिसरात पसरवलेल्या दहशतीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता, याला फडणवीस यांनी वरील उत्तर दिले.

अल्पवयीन मुलांचा वापर करून गुन्हे केलेल्यांना त्यांनी प्रत्यक्ष गुन्हा केला आहे, असे समजून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पोलिसांचा यामध्ये सहभाग आढळल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात येईल, अशी चेतावणी फडणवीस यांनी दिली. पुण्ो येथील सीसीटीव्हीचे जाळे मजबूत करून समाजात दहशत माजवणार्‍यांवर लक्ष ठेवता येईल. लहान मुलांना अमली पदार्थांचे व्यसन लावून त्यांच्याकडून गुन्हे करून घेतले जातात. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

संपादकीय भूमिका :

कोयता गँग अस्तित्वात नाही, असे सांगितले जात असले, तरी कोयत्याचा धाक दाखवून, तोडफोड करून समाजात दहशत पसरवली जात आहे. अशांवर कठोर कारवाई व्हायला हवी, तसेच समस्या मुळापासून सुटण्यासाठी कोयता विक्रेत्यांवरही लक्ष ठेवून कोयते कुणाला विकले जातात, यावर लक्ष ठेवायला हवे !