अस्तित्व टिकवायचे असेल, तर हिंदूंनी संघटित होणे, हाच एकमेव पर्याय ! – कपिल मिश्रा, भाजप नेते आणि माजी आमदार, देहली

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

‘ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभे’ने सहस्रो हिंदूंमध्ये जागवले नवचैतन्य !

पुणे – सद्यःस्थितीत हिंदु संस्कृती, सभ्यता, परंपरा, इतिहास, शौर्य याला अपमानित आणि समाप्त करण्यासाठी देशात प्रतिदिन नवीन षड्यंत्रे रचली जात आहेत. देशातील विविध राजकीय पक्ष, विविध क्षेत्रांतील लोक आणि बुद्धीजिवी वर्ग हिंदूंच्या सण-उत्सवांची थट्टा करून, तसेच हिंदु धर्माला अपमानित करून हिंदूंमध्ये न्यूनगंड निर्माण करत आहेत. हिंदूंना धर्म विसरण्यास भाग पाडले जात आहे. देशातील हिंदु मंदिरांवर आक्रमणे केली जात आहेत. राममंदिरासाठी निधी गोळा करणार्‍या रिंकू शर्मा या युवकाची देशाच्या राजधानीत चाकूने भोसकून हत्या केली जाते. या परिस्थितीत हिंदूंकडे हिंदुत्व हाच एकमेव पर्याय उरला आहे. असे न झाल्यास हिंदूंची ओळख पुसली जाईल. त्यामुळे आपापसांतील भेदभाव विसरून आपले अस्तित्व टिकवण्यासाठी संकल्पशक्ती, ऊर्जा आणि उत्साह यांनी भारलेल्या हिंदु बांधवांनी आता संघटित व्हायलाच हवे, असे प्रतिपादन देहली येथील भाजपचे नेते आणि माजी आमदार कपिल मिश्रा यांनी केले. ते २१ फेब्रुवारी २०२१ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदी ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते. या सभेला हिंदु जनजागृती समितीचे पूर्वोत्तर भारत मार्गदर्शन पू. नीलेश सिंगबाळ आणि सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. आनंद जाखोटिया यांनीही संबोधित केले.

प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमोल वानखेडे यांनी केलेल्या शंखनादानंतर पू. नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सनातन पुरोहित पाठशाळेचे पुरोहित अमर जोशी आणि चैतन्य दीक्षित यांनी वेदमंत्रपठण केले. यानंतर श्री. आनंद जाखोटिया यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण केला. या वेळी सनातनच्या बालसाधकांची राष्ट्र आणि धर्मजागृती यांविषयीची, तसेच स्वरक्षणविषयक प्रात्यक्षिकांची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. सूत्रसंचालन समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले.

हिंदूसंघटन हीच काळाची आवश्यकता ! – कपिल मिश्रा

कपिल मिश्रा

एका हिंदूवर आक्रमण किंवा अत्याचार झाले, तरी आपण आपल्यातील मतभेद विसरून एकत्र यायला हवे. चांगल्या कामांना प्रोत्साहन आणि पाठबळ देऊया, ही आजची आवश्यकता आहे. आजवर आपल्यावर अनेक आक्रमणे झाली. त्यांचा प्रतिकार आपण एकत्र येऊन केला आहे. संकटकाळात प्राणीही एकत्र येतात. आपण तर माणूस आहोत. आपण संघटित होऊन स्वतःचे आत्मबळ वाढवून लोकशाही मार्गाने लढाई लढूया. ही लढाई आपले अस्तित्व, हिंदु धर्मरक्षण आणि आत्मनिर्भर होण्याची आहे. जिवंत रहायचे असेल आणि हिंदु म्हणून स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर हिंदूसंघटनाला पर्याय नाही. हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता आहे.

विविध माध्यमांतून हिंदु धर्माचा केला जाणारा अवमान रोखण्यासाठी ईशनिंदाविरोधी कायदा आवश्यक ! – पू. नीलेश सिंगबाळ

पू. नीलेश सिंगबाळ

भारतात विविध माध्यमांतून जिहाद चालू आहे. त्यात इस्लामी नियमांनुसार चालू झालेल्या ‘हलाल’ अर्थव्यवस्थेने भारताच्या अर्थव्यवस्थेला आव्हान दिले आहे. ‘हलाल’ नावाच्या ‘फूड जिहाद’ला जागरूक भारतियांनी बळी न पडता त्यावर बहिष्कार घातला पाहिजे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली चर्च आणि मशिदी यांना हातही न लावणार्‍या राज्य सरकारांनी केवळ हिंदूंची मोठी मंदिरे स्वतःच्या नियंत्रणात घेतली आहेत. चित्रपट, वेब सिरीज आदींच्या माध्यमांतून हिंदु धर्माचा अवमान केला जात आहे. हे रोखण्यासाठी भारतात ईशनिंदाविरोधी कायदा लागू केला पाहिजे.

सध्या कोरोना महामारीने मानवाला त्याची मर्यादा दाखवून दिली आहे. त्यावर मात करण्यासाठी आपण साधना करून धर्मपालन आणि धर्माचरण केले पाहिजे. राष्ट्र आणि धर्म एकच आहेत. धर्माचे कार्य म्हणजेच राष्ट्रकल्याण पर्यायाने विश्‍वकल्याणाचे कार्य होते.

साधना करून लोककल्याणकारी हिंदु राष्ट्र-स्थापनेची पताका फडकावूया ! – आनंद जाखोटिया

आनंद जाखोटिया

हिंदु राष्ट्राची म्हणजे सनातन रामराज्याची संकल्पना विश्‍वमंगलाची कामना करणारी आहे. ती संकल्पना प्रत्यक्षात आणायची असेल, तर हिंदु राष्ट्र्र स्थापनेसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात हिंदूंचे संघटन करूया. केवळ घोषणा न देता आपण वेळ, त्याग आणि योगदान देऊन संपूर्ण विश्‍वात रामराज्य आणूया. कोरोना महामारीतून अजूनही संपूर्ण विश्‍व सावरलेले नाही. पुढे येणार्‍या कठीण काळात आत्मबळाची आवश्यकता आहे. हे बळ साधनेनेच निर्माण होईल. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांसारख्या शूर योद्ध्यांनीही नामस्मरण करत ईश्‍वराकडून सामर्थ्य प्राप्त केले होते. आपणही साधना करून लोककल्याणकारी हिंदु राष्ट्र-स्थापनेची पताका फडकावली पाहिजे. आपत्काळात लढण्यासाठी आपण साधना करून आत्मबळ वाढवणे आवश्यक आहे.

क्षणचित्रे

  • सभेच्या शेवटी उपस्थितांना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कटीबद्धतेची प्रतिज्ञासांगण्यात आली.
  • ‘हर हर महादेव’च्या गजरात विविध ठरावांचे वाचन करून संमती देण्यात आली.

विशेष

ही सभा फेसबूक, यू ट्यूब आणि ट्विटर यांच्या माध्यमातून ५४ सहस्र ७६० लोकांनी प्रत्यक्ष पाहिली.