|
मॉस्को (रशिया) – विरोधी पक्षनेते एलेक्सी नवेलनी यांच्या अटकेनंतर रशियामध्ये राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्या विरोधात लाखो लोक राजधानी मॉस्कोच्या रस्त्यांवर उतरले आहेत. रशियातील सुमारे १०० शहरांमध्ये लोक रस्त्यांवर उतरले आहेत.
मॉस्कोमध्ये पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. तसेच त्यांना फरपटत पोलीस वाहनांमध्ये टाकले. पोलिसांनी ३ सहस्रांहून अधिक लोकांना अटक केली आहे. मॉस्कोपासून दूरवर असलेल्या सायबेरिया, सेंट पीटर्सबर्ग येथेही लोक रस्त्यांवर उतरले आहेत. या आंदोलकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी ते वरिष्ठ नागरिकांपासून सारे सहभागी झाले आहेत. नवेलनी यांच्या पत्नी युलिया यांनीदेखील आंदोलनात भाग घेतला होता. त्यांनाही कह्यात घेण्यात आले आहे.
‘The problem is Putin’: protesters throng Russia’s streets to support jailed Navalny https://t.co/3ZIg5qiS39
— Guardian news (@guardiannews) January 23, 2021
मॉस्कोमध्ये नवेलनी यांना १७ जानेवारीला अटक करण्यात आली आहे. नवेलनी हे पुतिन यांचे कट्टर विरोधक मानले जातात. ऑगस्ट २०२० मध्ये नवेलनी यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला होता. विमान प्रवासात त्यांना विषमिश्रित पेय देण्यात आले होते. यानंतर त्यांची अवस्था गंभीर झाली होती. यातून बरे झाल्यानंतर नवेलनी यांनी जर्मनीत आश्रय घेतला होता. विश्रांती घेतल्यानंतर बर्लिन येथून नवेलनी १७ जानेवारीला मॉस्कोला परतले. या वेळी त्यांना विमानतळावरच अटक करण्यात आली.