नागपूर जिल्ह्यात पशूसंवर्धन विभागाने ४६० कोंबड्यांना ठार केले !

नागपूर – नागपूरसह राज्यातील ८ जिल्ह्यांत ‘बर्ड फ्ल्यू’च्या साथीने थैमान घातले आहे. भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशू रोग संस्थानच्या अहवालातून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. भोपाळच्या प्रयोगशाळेने हे अहवाल राज्याकडे पाठवले आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील वारंगा या गावातील मृत २३ कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. त्यांच्याकडून १९ जानेवारी या दिवशी ‘बर्ड फ्ल्यू’चा ‘पॉझिटिव्ह’ अहवाल आल्यानंतर पशूसंवर्धन विभागाने या गावातील ४६० कोंबड्यांना ठार केले आहे. नागपूरसह गडचिरोलीमध्येही एका ठिकाणी ‘बर्ड फ्ल्यू’चा शिरकाव झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.