राज्यात पाच दिवसांत १ सहस्र ८३९ पक्ष्यांचा मृत्यू

( प्रतिकात्मक चित्र )

मुंबई – राज्यात गेल्या पाच दिवसांपासून १ सहस्र ८३९ पक्ष्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्याचे पशूसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. मुंबई, दापोली, परभणी, लातूर येथील पक्ष्यांमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’चा प्रादुर्भाव दिसून आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील ‘बर्ड फ्ल्यू’ संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सचिंद्र प्रताप सिंह यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. सिंह म्हणाले की, मुंबई, ठाणे आणि दापोली येथील कावळे आणि बगळे, तसेच परभणी जिल्ह्यातील मुरुंबा येथील पक्ष्यांमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’चा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील २००, अमरावती जिल्ह्यातील ११ आणि अकोला जिल्ह्यातील ३ असे २१४ कुक्कुट पक्षी मंगळवारी दगावले आहेत. संबंधित नमुने पडताळणीसाठी भोपाळ आणि पुणे येथे पाठवले आहेत.

लातूर येथील नमुन्यांमध्येही संसर्ग आढळल्याने परिसराला संसर्गग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळेच परभणी जिल्ह्यातील मुरुंबा येथील ५ सहस्र ५०० आणि लातूर येथील १० सहस्र पक्षी तसेच ‘बर्ड फ्ल्यू’चा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणापासून १ कि.मी. त्रिज्येच्या परिसरातील सर्व कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात येणार असल्याचेही सिंह यांनी स्पष्ट केले.

घोडबंदर येथील वाघबीळ भागात मृतावस्थेत आढळलेल्या १५ पैकी ३ बगळे आणि एका पोपटाला बर्ड फ्ल्यूची लागण झाली आहे. संपूर्ण ठाणे शहरात विविध जातीचे १२१ पक्षी मृतावस्थेत आढळून आल्याने या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

खारघर येथे भारती विद्यापीठ इमारतीच्या मागील बाजूस दोन कावळे, तर खारघर रेल्वेस्थानक परिसरात एक कावळा आणि दोन साळुंखी पक्षी मृत अवस्थेत आढळून आले आहे.