चीनचे ‘सुपर सोल्जर्स’ (असामान्य सैनिक) आणि भारत !

निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन

लष्करी कारवाया करून भारताला लडाखमध्ये हरवण्यात चीनला गेल्या ७ मासांत पूर्ण अपयश आलेले आहे. त्यामुळे आता चीन विविध गैरलष्करी पद्धतींचा वापर करून भारत-चीन सीमेवर तणाव कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. सीमा कायम वादग्रस्त रहायला हवी, असे असल्याने भारताला तेथे मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करायला लागेल आणि भारताचे संरक्षण बजेट वाढून प्रगतीचा वेग मंदावेल, हा त्यामागील उद्देश आहे.

१. सैनिकांची जैविक क्षमता वाढवण्याचा चीनचा प्रयत्न

मागील वर्षी २ अमेरिकी विद्वानांनी युद्धक्षेत्रामध्ये ‘बायोटेक्नॉलॉजी’ लागू करण्याच्या चीनच्या महत्त्वाकांक्षेचे परीक्षण केले होते. त्यांना अभ्यासामध्ये आढळून आले की, चीनने मानवी कामगिरी वाढवण्यासाठी ‘जीन-एडिटिंग’ तंत्रज्ञान वापरले आहे. चीन जगातील मोठ्या आस्थापनांची बौद्धिक संपत्ती लुटतो, त्यांच्या तंत्रज्ञानाची नक्कल करतो आणि नंतर बाजारपेठेमध्ये त्या आस्थापनांची जागाही घेतो. ‘चीन त्याच्या सैनिकांची जैविक क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे जगाला धोका निर्माण होऊ शकतो’, अशी शक्यता अमेरिकेने वर्तवली आहे. चीनने जैविक क्षमता वाढवण्यासाठी त्याच्या सैनिकांवर अनेक जैविक चाचण्या केल्या आहेत. यामधून ‘सुपर सोल्जर्स’ (असामान्य सैनिक) निर्माण केले जात असावेत, अशी माहिती अमेरिकेचे ‘नॅशनल इंटेलिजन्स’चे संचालक जॉन रॅटक्लिफ यांनी दिली आहे. याविषयीची माहिती अमेरिकेच्या ‘वॉलस्ट्रीट जनरल’ या प्रख्यात पत्रिकेत प्रकाशित झाली आहे. चीन अनेक चाचण्या करत आहे. त्यामुळे चिनी सैनिकांची लढाऊ क्षमता वाढण्यास साहाय्य होईल.

२. ‘अ‍ॅथलेटिक्स’ स्पर्धेच्या वेळी अनेक खेळाडूंनी क्षमता वाढवण्यासाठी अवैध गोष्टींचा वापर करणे

चीनने क्षमता वाढवण्यासाठी जैविक तंत्रज्ञानाचा वापर यापूर्वीच केला होता. अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांच्या वेळी क्षमता वाढवण्यासाठी अनेक जण हार्मोन्सची इंजेक्शने घेतात, तसेच स्टेरॉईड्सचे सेवन करतात. यातून ठराविक काळापुरती त्यांची क्षमता वाढते. त्यामुळे जागतिक विक्रम करण्यात त्यांना साहाय्य होते.

अर्थात् या प्रकारांमुळे अनेक जागतिक दर्जाचे खेळाडू अडचणीत आले आहेत. काही वर्षार्ंपूर्वी ज्यो ग्रिफिश जॉयनर नावाच्या अमेरिकी महिला खेळाडूने दोन वेळा जागतिक स्तरावरील सुवर्णपदक जिंकले होते. १० सेकंदामध्ये १०० मीटर अंतर पार करणारी ती जगातील पहिली महिला खेळाडू ठरली होती. त्या वेळी संशय व्यक्त करण्यात आला होता की, ती कोणत्यातरी अमली पदार्थांचे सेवन करत असावी. हा संशय खरा ठरला. जागतिक विक्रम मोडीत काढल्यानंतर २ वर्षांतच तिचा मृत्यू झाला.

भविष्यातील युद्धांमध्ये या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो. ‘सुपर सोल्जर’ची संकल्पना विज्ञानकथांमधून विचारात घेण्यात आली आहे. त्यामध्ये डीएन्ए किंवा जनुकीय रचनेत पालट करून मानवी क्षमता वाढू शकते, असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. ‘आर्टिफिशियल इंटलिजन्स’प्रमाणेच शरिराचे भाग स्वत:हूनच वाढणारे अवयव यांसारख्या गोष्टी भविष्यात अस्तित्वात येऊ शकतात; मात्र निसर्गाच्या विरोधात जाऊन मानवी शरिरामध्ये पालट करणे योग्य नाही. म्हणून शास्त्रज्ञ आणि समाज अशा संशोधनाला विरोध करतो.

३. चीनने जैविक संशोधनाचा वापर करून सैनिकांची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करण्यामागील कारण

जैविक संशोधनाचा वापर करून आपली शारीरिक क्षमता तात्पुरती वाढू शकते किंवा काही काळापुरती मर्यादित असते, तसेच त्याचे मानवी शरिरावर दुष्परिणामही होतात. मग चीन हे का करत आहे ? चिनी सैनिकांची अत्यंत उंच ठिकाणांवर लढण्याची क्षमता अल्प पडत आहे. त्यामुळे त्या भागात असणार्‍या सैनिकांची क्षमता वाढवण्यासाठी चीन ‘सुपर सोल्जर्स’ची निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे. असे ‘सुपर सोल्जर्स’ रात्रीच्या वेळेला चांगल्या पद्धतीने काम करू शकतील. त्यांचे बळ, क्षमता आणि चपळता पुष्कळ वाढली असेल, तसेच सर्वसाधारण चिनी सैनिकांच्या तुलनेत पुष्कळ अधिक वेळ या कठीण सीमेवर ते चांगल्या पद्धतीने काम करून शत्रूचा पराभव करू शकतील.

४. चीनचे जैविक संशोधन थांबवण्यासाठी जागतिक दबाव वाढवणे आवश्यक !

चीनने जागतिक महासत्ता होण्यासाठी नैतिकतेचे पालन केलेले नाही. अशा प्रकारे त्यांनी वुहान प्रयोगशाळेत चिनी विषाणूची निर्मिती करून जगाचे कंबरडे मोडले आहे. तशाच प्रकारे मानवजातीवर जैविक संशोधन करून जगावर राज्य करण्याची चीनची लालसा आहे. त्यामुळे जगाने या विषयावर गांभीर्याने विचार केला पाहिजे. चीनच्या या कारवायांना रोखण्यासाठी जग काय करू शकते ? जगाचे कायदे असे म्हणतात की, जैविक किंवा रासायनिक संशोधन हे मानवजातीच्या विरोधात असेल, तर ते केले जाऊ नये. या कायद्याचा चीनच्या विरोधात वापर करून अशा प्रकारचे संशोधन थांबवण्यासाठी त्याच्यावर दबाव आणणे आवश्यक आहे. चीन या दबावाला भीक घालेल का ? तर याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. चीन अनेक आंतरराष्ट्रीय कायदे पाळत नाही, तसेच यामध्येही होऊ शकते. त्यामुळे सर्वसामान्य चिनी नागरिकांसाठी मानसिक युद्ध करावे लागेल. त्यांना सांगावे लागेल की, चीन सरकार चिनी नागरिकांवर संशोधन करून त्यांचे आरोग्य धोक्यात आणत आहे.

५. चीनवर बारीक लक्ष ठेवले पाहिजे !

काही वर्षांपूर्वी चिनी खेळाडूंनी जगावर वर्चस्व गाजवायला प्रारंभ केला होता. त्याही वेळेला चिनी खेळाडू अचानक जागतिक दर्जाचे कसे होऊ लागले, अशी शंका निर्माण झाली होतीच. याही वेळेला त्यांनी अमली पदार्थ, संप्रेरकांची इंजेक्शने, तसेच जैविक संशोधनातून त्यांची क्षमता वाढवली असावी, तसेच अशा गोष्टी यापूर्वीही झाल्या असाव्यात. चीनमध्ये हे सर्व करण्याची क्षमता नक्कीच आहे. त्यामुळे चीन नेमके काय करत आहे, यावर जगाने बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे.

६. इतर देशांचे ‘सुपर सोल्जर्स’ विकसित करण्याचे प्रयत्न

अमेरिकेच्या सैन्याकडूनही ‘सुपर सोल्जर्स’ विकसित करण्याचे प्रयत्न झाले होते. त्यामध्ये दुखण्यावर मात करणे, टेलिपॅथी किंवा रोबोटिक्स यांचा विचार करून सैनिकांची परिणामकारकता वाढवण्याचा प्रयत्न केला. अन्य देशांनीही अशा संशोधनामध्ये गुंतवणूक केली. त्यात विशेष प्रगती झाली नाही; मात्र संशोधन थांबले नाही. ‘स्पोर्ट मेडिसीन’मध्ये खेळाडूंची कामगिरी वाढवण्यासाठी अविरत संशोधन केले जाते; मात्र नैतिकतेची सीमा ओलांडली जात नाही.

७. भारताने जगाने मान्य केलेल्या पद्धतीने संशोधन करावे !

भारताचा विचार करता स्वत:चे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जैविक पद्धतीचा वापर करता येऊ शकतो. चिनी विषाणूच्या विरोधात लसीचे संशोधन केले जात आहे. जगाने मान्य केलेल्या पद्धतीने भारतीय शास्त्रज्ञांनीही संशोधन चालू करावे, म्हणजे अशा प्रकारच्या जैविक धोक्यांना तोंड देण्यासाठी भारत सिद्ध राहू शकेल. जोपर्यंत चिनी ‘सुपर सोल्जर्स’चा प्रश्‍न आहे, तर चीनवर बारीक लक्ष ठेवून आवश्यकता भासली, तर जगाचे साहाय्य घेऊन चीनचे घातक संशोधन थांबवण्याची आवश्यकता आहे. जगातील विविध कायद्यांचा वापर करून चीनला थांबवण्याचा प्रयत्न केला जावा.

८. चीनच्या जैविक संशोधनाला इस्रायल पद्धतीने उत्तर देता येईल का ?

जगाच्या विरोधात संशोधन केले जात असतांना इस्रायलने अनेक वेळा संशोधकांवर किंवा संशोधन संस्थांवर आक्रमण केले आहे, उदा. गेल्या मासात इराणचे अणूशास्त्रज्ञ जे इराणसाठी अणूबॉम्ब सिद्ध करत होते, त्यांना ठार मारले. त्यामुळे इराणचा आण्विक कार्यक्रम मागे पडला. अशा कारवाया अमेरिका, इतर युरोपीय देश हे चीनच्या विरोधात करू शकतील का ? आपल्याकडे चीनच्या संशोधनाला प्रत्युत्तर देण्यासाठी वेळ आहे. या वेळेचा सदुपयोग करून आपणही आपल्या संशोधनाचा वेग वाढवला पाहिजे.

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे