पीडित महिलेवर बहिष्कार टाकणार्‍या गावांवर प्रशासक नेमा !

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र

बीड – सामूहिक अत्याचार प्रकरणातील पीडित महिलेवर बहिष्कार टाकून गावातून बाहेर काढण्याचा ठराव घेणार्‍या तिन्ही गावांत प्रशासक नेमावेत, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्राद्वारे दिल्या आहेत. गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील एका महिलेवर वर्ष २०१५ मध्ये ४ जणांनी दोन वेळा सामूहिक बलात्कार केला होता.

या प्रकरणातील ४ आरोपींना ऑक्टोबर २०२० मध्ये न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पीडित महिलेच्या अल्पवयीन मुलीवरही लैंगिक अत्याचार झाल्याविषयी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. डिसेंबर २०२० मध्ये पाचेगाव ग्रामस्थांनी महिला सतत नागरिकांना धमकावते, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देते. त्यामुळे या महिलेपासून संरक्षण मिळावे, असे निवेदन पोलीस अधीक्षकांना दिले होते. या वेळी ग्रामस्थांनी ३ ग्रामपंचायतींचे ठरावही समवेत आणले होते. या ठरावांमध्ये महिलेला ३ ग्रामपंचायतींमधून हद्दपार केले जात असल्याचे म्हटले होते.