१५ जानेवारीपासून राज्यव्यापी शाळा बंद करण्याची महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाची चेतावणी 


मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव अल्प झाल्यानंतर १० मासांनी शासनादेशानुसार राज्याच्या बहुतांश भागांतील शाळा चालू झाल्या आहेत; मात्र आता महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने वेतनेतर अनुदान आणि कोरोनासाठी लागणार्‍या आर्थिक व्यय तरतुदीच्या मागणीसाठी १५ जानेवारीपासून राज्यव्यापी शाळा बंद ठेवण्याची चेतावणी दिली आहे. त्यामुळे एकीकडे शाळा चालू करण्यासाठी प्रयत्न होत असतांना दुसरीकडे शाळांनी बंड पुकारले आहे.

राज्यातील खासगी शिक्षण संस्थांनी राज्य शासनाच्या आदेशानुसार शाळा चालू करण्याचे धोरण निश्‍चित केले आहे; मात्र शाळा चालू करण्यापूर्वी शासनाने थकित वेतनेतर अनुदान अद्यापही उपलब्ध करून दिलेले नाही. त्यामुळे राज्यातील खासगी शिक्षण संस्थाचालकांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. शाळा चालू करण्यापूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागणारा व्यय शासनाने संस्था चालकांना अदा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. संस्थाचालक अनेक दिवसांपासून राज्य शासनाकडे या समस्या मांडत आहेत; परंतु शासन निर्णय घेत नसल्याने त्यांना अशी चेतावणी द्यावी लागली आहे.

देशातील इतर राज्यांमध्ये शिक्षणावर ९ ते १० टक्के व्यय केला जातो; मात्र महाराष्ट्रात तो ६ टक्के केला जातो. त्यामुळे गुणवत्तापूर्ण आणि चांगल्या दर्जाचे शिक्षण देणे कठीण होत चालले आहे. मागण्या मान्य न केल्यास राज्यव्यापी बेमुदत शाळा बंद आंदोलन करू. – विजय नवल पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ