३० जानेवारीला पुण्यात एल्गार परिषद घेण्याची बी.जी. कोळसे-पाटील यांची घोषणा

पूर्वानुभव पहाता या प्रकरणी गंभीर राहून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणार्‍या कोळसे-पाटील यांच्यावर पोलीस कारवाई करणार का ?

बी.जी. कोळसे-पाटील

पुणे – यापूर्वी पुणे पोलिसांनी ३१ डिसेंबरच्या नियोजित एल्गार परिषदेला अनुमती नाकारली होती; मात्र आता पुन्हा ३० जानेवारीला पुण्यातील गणेश कला क्रीडा सभागृहात एल्गार परिषद घेण्याचा मानस माजी न्यायाधीश बी.जी. कोळसे-पाटील यांनी व्यक्त केला आहे. पुण्यात यापूर्वी झालेल्या एल्गार परिषदेमुळे उद्भवलेला वाद अद्याप शमला नसतांनाच नव्या परिषदेची घोषणा त्यांनी केली आहे. ३१ डिसेंबर या दिवशी ‘भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियाना’च्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

वर्ष २०१७ मधील एल्गार परिषदेनंतर दुसर्‍या दिवशी कोरेगाव भीमा येथील स्तंभाजवळ हिंसाचाराची घटना घडली होती. या हिंसाचाराला एल्गार परिषदेची किनार असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले होते. शहरी नक्षलवादाशी जोडली गेलेली एल्गार परिषद, त्यानंतर डाव्या विचारांच्या अनेक बुद्धीवादींना झालेली अटक यानंतर आतापर्यंत या प्रकरणात देशातील विविध न्यायालयांत ११८ याचिका प्रविष्ट आहेत.

‘सरकारने अनुमती नाकारली, तर एल्गार परिषद रस्त्यावर घेऊ, अन्यथा ‘जेल भरो’ आंदोलन केले जाईल’, असे कोळसे पाटील यांनी सांगितले आहे.