मराठा संघटनांची राज्यपालांकडे मागणी
मुंबई – नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि मदत अन् पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे मराठा आणि इतर मागासवर्गीय समाज यांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांचे त्यागपत्र घेऊन मंत्रीमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि छावा संघटना यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासाठी २९ डिसेंबर या दिवशी संघटनेच्या प्रतिनिधींनी राज्यपालांची भेट घेतली.
या निवेदनामध्ये म्हटले आहे, ‘‘छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांच्यामुळे मराठा आणि इतर मागासवर्गीय या दोन समाजात संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे दोन्ही नेते मोर्चे काढू, आंदोलन करू, इतर मागासवर्गीय समाजातून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, अशी भडकावू वक्तव्ये करत आहेत. समाजात जातीय दंगली निर्माण करण्याचा दोघांचा प्रयत्न आहे.’’