मुंबई – काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिघेही केंद्रीय यंत्रणांचा चुकीचा उपयोग करत आहेत. अन्वेषण यंत्रणांचा चुकीचा वापर होत असेल, तर अंमलबजावणी संचालयालय आणि केंद्रीय अन्वेषण यंत्रणा यांच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करायला हवी. मी स्वत: याविषयी विचार करणार आहे, असे वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले. पुणे येथील भोसरी भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना नोटीस पाठवली आहे. याविषयी प्रसिद्धीमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी वरील विधान केले. अंजली दमानिया यांनी यापूर्वी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
या वेळी अंजली दमानिया म्हणाल्या, ‘‘भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढ्याला आता काही अर्थ उरला नाही. जे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देतात. अशा आमच्या सारख्यांची मात्र अपकीर्ती केली जाते. मी २०१६ पासून लढत आहे. अंमलबजावणी संचालनालयाला आता जाग आली का ?’’