इचलकरंजी नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – इचलकरंजी शहरातील उद्योगधंद्यातील प्रदूषित पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळते. नदी प्रदूषित झाल्याने इचलकरंजी शहराजवळ असलेल्या तेरवाड बंधार्यावर सहस्रो मासे मृतावस्थेत तरंगतांना आढळून आले. यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने तेरवाडचे ग्रामस्थ आक्रमक झाले आणि त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांना तेरवाड बंधार्यावरच बांधून ठेवले. (सहस्रो मासे मृत होईपर्यंत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी काय करत होते ? ‘गणेशोत्सवात गणेशमूर्तींमुळे प्रदूषण होते’, अशी ओरड करणारे प्रदूषण मंडळ उद्योगधंद्यांमुळे होणार्या प्रदूषणाकडे मात्र नेहमीच डोळेझाक करते ! यामुळे ग्रामस्थांचा अशा प्रकारे उद्रेक होऊन अधिकार्यांना बांधून ठेवण्याचा प्रकार होतो. यापुढे तरी प्रदूषण मंडळाने संबंधित उद्योगधंद्यांवर योग्य ती कारवाई करावी ! – संपादक)
अखेर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव अशोक शिंगारे यांनी ‘प्रशासनाने या मृत माशांची नदीतून उचलून शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी, तसेच नदीकाठच्या बंधार्यावर येत्या ७२ घंट्यात क्लोरिनचा डोस चालू करावा’, अशा प्रकारचा आदेश दिला आहे. तसेच इचलकरंजी नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यावर प्रदूषण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विरोधात नदीकाठच्या ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलन केले; पण याची नोंद प्रशासनाने म्हणावी तशी कधीच घेतली नाही. गेली अनेक वर्षे इचलकरंजी शहरातील उद्योगधंद्यांचे प्रदूषित पाणी नदीत मिसळत आहे. दळणवळण बंदीच्या काळात शुद्ध झालेली पंचगंगा आता यामुळे परत प्रदूषित झाली आहे. याचा फटका हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यांना मोठ्या प्रमाणावर बसतो.
प्रदूषण मंडळाचे अधिकारी सचिन हरबड यांना बंधार्याच्या खांबाला दोरीने बांधल्याप्रकरणी ५ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद
कुरुंदवाड (जिल्हा कोल्हापूर) – शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथे पंचगंगा नदीतील प्रदूषित पाण्याचे नमुने आणि मृत मासे यांचा पंचनामा करण्यासाठी आलेले प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सचिन हरबड यांना बंधार्याच्या खांबाला दोरीने बांधून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ५ जणांच्या विरोधात कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.