स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या कुलगुरूंवर भ्रष्टाचाराचे आरोप

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले

लातूर – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापिठातील कामात घोटाळा केल्याचा आणि चारचाकी वाहनांच्या ‘व्हीआयपी’ क्रमांकासाठी सहस्रो रुपये मोजले असल्याचा आरोप सिनेट सदस्य तथा युवा सेनेचे प्राध्यापक सूरज दामरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. स्वाराती विद्यापिठाचे उपकेंद्र लातूर येथे आहे. या विद्यापिठात मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे. यामध्ये साहित्य खरेदीपासून ते कुलगुरूंच्या वाहनापर्यंत कशा प्रकारे पैसे व्यय केले जात आहेत, त्याचा लेखाजोखा प्राध्यापक सूरज दामरे यांनी या वेळी मांडला.

या वेळी दामरे म्हणाले की,

१. काही मासांपूर्वी ‘कोविड लॅब’च्या उभारणीत आणि साहित्य खरेदीसाठी १ कोटी ७ लाख ८५ सहस्र रुपयांचा निधी संमत झाला होता. यासाठी निविदा काढून त्या प्रसिद्ध करून काम करणे आवश्यक होते; मात्र नियमांची कार्यवाही न करता सलगीच्या कंत्राटदाराला याचे काम देण्यात आले होते. ‘पीपीई किट’ आणि ‘मास्क’ यांचे दरही मनमानी करण्यात आले होते.

२. विद्यापीठ परिसरात एक बंधारा उभारण्यात आला आहे. यासाठी १२ लाख रुपये अंदाजे रक्कम निश्‍चित करण्यात आली होती; पण निविदा न काढता हे काम केवळ ६ लाख ५४ सहस्र रुपयांत पूर्ण केल्याचा आरोप प्राध्यापक दामरे यांनी केला आहे.

३. चारचाकी वाहनाच्या ‘व्हीआयपी’ क्रमांकासाठी कुलगुरु यांनी ५० सहस्र रुपये मोजले आहेत, तसेच आणखी एक आलिशान चारचाकी कुलगुरु यांनी खरेदी केली आहे.