भारतियांची नैतिकता रसातळाला ?

विवाहबाह्य संबंधांसाठी असलेल्या ‘ग्लीडेन’ या ‘डेटिंग अ‍ॅप’वर भारतीय वापरकर्त्यांनी १३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. या ‘अ‍ॅप’ने ४ दिवसांपूर्वीच त्यांची माहिती सार्वजनिक केली आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर या ३ मासांच्या कालावधीत भारतीय ‘सबस्क्रायबर्स’ची (सदस्यांची) संख्या प्रचंड वाढली. एकूण २४६ टक्क्यांनी यामध्ये वाढ झालेली आहे. गेल्या ४ मासांमध्ये एकूण ३ लाखांहून अधिक भारतीय या ‘अ‍ॅप’चे सदस्य झाले आहेत. वर्ष २०१९ च्या तुलनेत वर्ष २०२० मध्ये या ‘अ‍ॅप’वर वेळ घालवणार्‍यांचे प्रमाण तिपटीने वाढले आहे. भारतीय शहरांमधील बेंगळुरूमध्ये १६.२ टक्के, तर मुंबईतून १५.६ टक्के लोक सदस्य झाले. ‘युरोपियन नागरिकांपेक्षा भारतीय जवळजवळ साडेतीन घंटे या ‘अ‍ॅप’वर वेळ घालवतात’, असे या ‘अ‍ॅप’च्या आकडेवारीतून स्पष्ट होते. परिणामी दळणवळण बंदीच्या कालावधीत ‘ग्लीडेन’ आस्थापनाच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली. या माहितीवरून विवाहबाह्य संबंध ठेवण्याचे भारतियांचे प्रमाण किती धक्कादायक आहे, हे लक्षात येते. या ‘अ‍ॅप’वर नोंदणी झालेल्या सदस्यांमध्ये पुरुष आणि महिला दोन्हींचे प्रमाण अधिक आहे. महिलांसाठी ‘अ‍ॅप’ नि:शुल्क, तर पुरुषांना काही पैसे भरून सदस्य होता येते.

भारताकडे पाहिले, तर जगात कुठे काही संस्कृती टिकून राहिली आहे, तर भारताकडे बोट दाखवले जाते. कुटुंबव्यवस्था प्रमाण मानणार्‍या भारतासारख्या सुसंस्कृत देशात या आकडेवारीमुळे भारतियांचे कोणत्या दिशेने स्थित्यंतर होते आहे, हे लक्षात येते. हिंदु संस्कृतीत ७ जन्म हाच पती किंवा हीच पत्नी मिळावी म्हणून अग्नीला साक्षी ठेवून सात फेरे घालण्यात येतात. पती आणि पत्नी यांचा एकमेकांवर विश्‍वास असतो. त्या विश्‍वासातून संसाराचा गाडा एकमेकांच्या साहाय्याने हाकला जात असतो. असे असतांना एकाएकी असे काय झाले की, भारतीय विवाहबाह्य संबंधांच्या आहारी जात आहेत ?

कोरोनाच्या म्हणजेच दळणवळण बंदीच्या कालावधीत कामावर जाणारे अनेक महिला आणि पुरुष घरातच थांबले. कार्यालय अथवा बाहेर गेल्यावर काही पुरुष अथवा महिला यांचे अनैतिक संबंध पूर्वीपासून होते, त्यांना भेटण्यात अडचण असल्याने सामाजिक माध्यमांचा आधार घेतला. घरात संबंधितांच्या जोडीदाराला हे लक्षात आल्यावर पती आणि पत्नी यांच्यात खटके उडू लागले आणि त्याचे पर्यवसान काही दिवसांमध्येच घटस्फोटांच्या प्रमाणात वाढ होण्यामध्ये झाले. याचाच अर्थ काहींमध्ये विवाहबाह्य संबंध होतेच; मात्र ते जपण्यात सामाजिक माध्यमांचा आधार घेतला गेला. तेथेच ते उघड झाले आणि ‘ग्लीडेन’सारख्या ‘अ‍ॅप’ने त्यांना समाजमान्यताच (अधिकृतपणा) मिळवून दिल्यासारखे झाले.

चित्रपट आणि मालिका कारणीभूत

विवाहबाह्य संबंधांचा विचार केला, तर याला कारणीभूत अथवा मोठा वाटा हा बहुतांश चित्रपट आणि मालिका यांचा आहे. ९० च्या दशकातील अनेक गाजलेले चित्रपट यांमध्ये एक नट आणि दोन नट्या यांचा समावेश असायचा. एकीसमवेत प्रेम होऊन नंतर संसार थाटून पुन्हा दुसर्‍या अभिनेत्रीसमवेत प्रेमप्रकरणाचा भाग दाखवला जायचा. त्यातही अभिनेता मुसलमान आणि दोन्ही अभिनेत्री हिंदु ! नंतर याचे ‘फॅड’ मालिकांमध्ये पहाण्यास मिळाले. आता तर ज्या मराठी मालिका आहेत, त्यांच्या अगदी नावांपासूनच प्रारंभ ! ‘माझ्या नवर्‍याची बायको’ या मालिकेचे नाव ऐकूनच यात काय असेल, हे लक्षात येते. अन्य काही मराठी मालिकांमध्ये नेमकी कथा काय, तर अशा संबंधांचेच चित्रीकरण आणि ते केंद्रस्थानी ठेवून चर्चा ! या विकृतीचा सातत्याने भडिमार लोकांवर होत असतो. सातत्याने पती-पत्नी यांच्या पवित्र नात्याला खोडा घालून अथवा बगल देऊन तुम्ही विवाहबाह्य संबंध कसे टिकवू शकता ? याचे अजब चित्रीकरण या मालिकांमध्ये असते. म्हणजे विवाहबाह्य संबंधांना जणू या माध्यमातून प्रशिक्षणच देण्यात येते, असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही. त्यामुळे लोकांना यामध्ये चुकीचे काही आहे, असे वाटत नाही. हे योग्यच आहे किंवा ते चालू शकते, असे वाटते.

पती-पत्नी यांनी एकमेकांना केवळ उपभोग्य वस्तू म्हणून पहाण्याची मानसिकता झाल्याने भावनांमधील ओलावा निघून गेला. त्यामुळे लग्नाकडे ‘एक करार’ म्हणूनच पाहिले जाते. श्राद्ध-पक्ष न केल्यामुळे अतृप्त पूर्वजांचा होणारा त्रास या भागाकडे दुर्लक्ष केल्यामुळे एकमेकांमध्ये न पटणे, क्षुल्लक कारणावरून प्रचंड भांडणे होणे, हत्या करणे असे प्रकार होत आहेत. कलियुगात याचे प्रमाण अधिक आहे. ‘लिव्ह इन रिलेशनशीप’चा उदोउदा केला जातो. त्याला कायदेशीर मान्यता मिळाल्यामुळे फावलेच आहे. विवाह न करता एकमेकांसमवेत रहाण्याला पसंती दिली जाते, त्यातून एकमेकांवर अविश्‍वास निर्माण झाला की, आत्महत्या केल्या जातात, हे प्रसिद्धीचे वलय असणार्‍या काही अभिनेत्यांमध्ये झाल्याचे लक्षात येते.

भारतीय स्त्रीची महानता

भारतीय स्त्रीचे मन कसे असते ? हे सांगणारी एक वास्तव कथा आहे. एका पराक्रमी भारतीय राजाचे राज्य अभेद्य होते. त्याच्यावर परचक्र आले. भारताबाहेरून आलेल्या मोगलांनी त्याच्यावर आक्रमण केले. राजा शूरवीर होता. त्यामुळे त्याने पराक्रम दाखवून मोगलांना थोपवून धरले; मात्र नंतर लक्षात आले की, त्याच्या सरदाराने फितुरी केली आणि राज्यात कसे शिरायचे ?, राज्यातील आक्रमण योग्य ठिकाणे कोणती ? आदी शत्रूला सांगितले. राजाच्या त्या सरदाराचे लग्न ठरले होते. भावी पत्नीला स्वत:च्या भावी पतीने ही फितुरी केल्याचे लक्षात आले. तिने भर राजसभेत आपल्या भावी पतीचा अपराध राजाला कथन केला आणि नंतर राज्याचा शत्रू म्हणून त्याच्यावर तलवार उपसून त्याला ठार केले. नंतर स्वत: जवळील कट्यार काढून स्वत:च्या पोटात खुपसली आणि ‘मी भारतीय स्त्री असून तिने एकदा एका पुरुषास मनोमन वरले की, ती दुसर्‍या पुरुषाचा विचारही करू शकत नाही. माझ्या भावी पतीचा मृत्यू झाला असल्याने मीसुद्धा त्याच्या समवेत एक पतीनिष्ठ स्त्री म्हणून जात आहे’, असे तिने सांगून तिचे प्राणोत्क्रमण झाले. यातून भारतीय स्त्रीची पतीनिष्ठा लक्षात येते.

अमेरिकेत विवाहबाह्य संबंधांना ऊत आल्यावर तेथील सरकारने ‘बॅक टू फॅमिली’, ‘बॅक टू मदरहूड’ यांसारख्या चळवळी चालू केल्या. लोकांना लग्न टिकवण्यासाठी आवाहन केले. विदेशातील हे आवाहन भारतियांना करावे लागू नये, यासाठी विकृत मालिका, चित्रपट यांवर निर्बंध घालण्यासमवेत लोकांना नैतिकता वाढवण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.