गोवा मुक्तीच्या हिरकमहोत्सवी वर्षाच्या गोमंतकियांना हार्दिक शुभेच्छा !

गोवा ही परशुरामभूमीच !

श्री परशुराम

भगवान श्रीविष्णूचा सहावा अवतार श्री परशुराम याने समुद्र हटवून कोकणची भूमी निर्माण केली. ‘गोमंतक’ किंवा ‘गोवा राष्ट्र’ हे त्याच्या ७ विभागांपैकी एक आहे. दुसर्‍या एका परंपरेनुसार श्री परशुरामाने गोमंतकात पेडणे तालुक्यातील हरमल येथे अश्‍वमेध यज्ञ केला. एका पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने पार्वतीचा त्याग केला आणि कैलास सोडून गोमंतकमध्ये ‘गोमंतकेश’ या नावाने निवास केला होता. सप्तर्षींनी येथे ७० लाख वर्षे तपश्‍चर्या केली होती आणि शिवाला प्रसन्न करून घेतले होते. शिवाने सप्तकोटेश्‍वराच्या रूपात त्यांना दर्शन दिले आणि आशीर्वाद दिले होते.

गोव्याचा वैभवशाली इतिहास !

गोवा हा कोकणीमध्ये ‘गोंय’ आणि मराठीमध्ये ‘गोवे’ म्हणून ज्ञात आहे. मद्रास शब्दकोषामध्ये त्याला संस्कृतमधील ‘गो’ म्हणजे गाय या शब्दाशी जोडले असून त्या अर्थाने त्याला ‘गोपालांचा देश’ असे संबोधले आहे. ‘गोमंत’ या शब्दाचे ते संक्षिप्त रूप आहे. महाभारत पुराणाच्या भीष्मपर्वाच्या ९ व्या कांडामध्ये ‘गोमंतक’ या शब्दाचा उल्लेख आढळतो. गोमंतक हा शब्द ‘गो’ + ‘गोमंत’ + ‘क’ असा उत्पन्न झाला आहे. ‘गो’ म्हणजे ‘गाय’, ‘गोमंत’ म्हणजे ‘गायींचे पालन करणारा’ आणि ‘क’ हा प्रत्यय त्याला जोडला असून तो दुर्मिळ स्थिती दर्शवतो.

हरिवंश पुराणामध्ये ‘गोमांचल’ या पर्वताचा उल्लेख आढळतो. त्या पर्वतामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि मगध देशाचा राजा जरासंध यांच्यात घनघोर युद्ध होते अन् त्यात जरासंधाचा पूर्ण पराजय होतो. शिलहारा राजा गणरादित्य (इ.स. १११५) यांच्या कोल्हापूर सनदमध्ये ‘गोमांचल’सदृश ‘गोमंत दुर्ग’ या शब्दाचा उल्लेख आहे. यावरून कोल्हापूरच्या शिलहारा राजाकडे ‘गोमंत दुर्ग’चे स्वामीत्व होते, हे लक्षात येते. या किल्ल्याला वेढलेल्या प्रदेशालाच ‘गोमंतक’ असे म्हटले गेले आहे. गोव्याच्या पूर्वेकडील सह्याद्री पर्वत आणि पश्‍चिमेकडील अरबी समुद्र येथून गोव्यात अनेक वर्षांपासून संस्कृतीची परस्पर देवाणघेवाण झाली. गोव्याच्या सांस्कृतिक विकासामध्ये त्याचा अमिट ठसा उमटला आहे.

गोव्याचे प्राचीन सत्ताधीश

  • भोज, सातवाहन, मौर्य, बदामीचे चालुक्य, शिलहारा, कदंब, विजयनगर, बहामनी राजे इत्यादी प्राचीन राजघराण्यांनी गोव्यावर राज्य केले.
  • भोज राजघराण्याने कोकणवर सत्ता स्थापित केल्यानंतर पारोडा नदीच्या काठावरील चंद्रपूर (आताचे चांदोर) हे त्यांचे राजधानीचे शहर होते.
  • त्यानंतर राजधानीचे शहर गोपकापट्टण (आताचे व्हडले गोंय) येथे स्थलांतरित करण्यात आले. कदंब राजवटीच्या काळात या राजधानी शहराचा मोठा विकास झाला होता.

कदंबचा वैभवशाली इतिहास

वैभवशाली कदंबकालीन सोन्याची नाणी

कदंब राजघराण्याच्या राजवटीत गोव्याची गौरवशाली प्रतिष्ठा आणि कीर्ती सर्वदूर पसरली होती. कदंब राजघराण्याचा मूळ वंशज जयंत हा त्रिनेत्र आणि चतुर्भूज होता. भगवान शिवाने त्रिपुरासुरावर विजय मिळवल्यानंतर शिवाच्या कपाळावरील घामाचा एक थेंब कदंब झाडाखाली पडला. ‘या थेंबातून जयंत अवतरित झाला होता’, असा या राजघराण्याचा दावा होता. कदंब राजघराण्याचे कुलदैवत सप्तकोटेश्‍वर शिव आणि श्री चामुंडादेवी होती. कदंब राजा जयकेशी द्वितीय यांच्या राजवटीत गोव्याची कीर्ती आणि प्रतिष्ठा यांनी उच्च शिखर गाठले होते. सिंहाचा शिक्का असलेली सोन्याची नाणी हे त्यांच्या वैभवाची साक्ष देते.

गोव्याचे मध्ययुगातील राज्यकर्ते

वर्ष १३०० ते १५१० या कालावधीत कदंब, चालुक्य, विजयनगर इत्यादी राजघराणी आणि बहामनी राजे यांनी गोव्यावर राज्य केले. वर्ष १४८९ ते १५१० या कालावधीत गोव्यावर बिजापूरच्या युसुफ आदिलशहाची राजवट होती.

गोव्याच्या भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक स्थितीचा अभ्यास केल्यास गोवा हा भारताचा अविभाज्य घटक, हे सिद्ध !

पोर्तुगिजांची क्रूर राजवट (१५१० ते १९६१)

नियमांचे पालन न करणाऱ्यांना जिवंत जाळणे
  • वर्ष १५६० मध्ये ‘इन्क्विझिशन’ची स्थापना
  • हिंदूंनी धार्मिक प्रतिमा किंवा चिन्ह बाळगणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आणि हिंदूंची मंदिरे तोडण्याचा आदेश
  • हिंदु सण साजरे करण्यावर बंदी
  • हिंदूंच्या घरांची झडती घेऊन धार्मिक वस्तू आढळल्यास कठोर शिक्षा

गोवा मुक्तीसाठी राष्ट्रीय चळवळ

  • पोर्तुगालमध्ये १९२६ मध्ये सालाझार यांची हुकुमशाही राजवट चालू
  • वर्ष १९३३ मध्ये वसाहती कायदा संमत करून जनतेचे नागरी स्वातंत्र्य हिरावून  घेण्यात आले.
  • अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संघटन स्वातंत्र्य यांवर बंदी
  • पोर्तुगीज अधिकार्‍यांकडून गोव्यातील जनतेवर अनन्वित अत्याचार
  • काही राष्ट्रवादी नेते एकत्र येऊन गोवा काँग्रेस कमिटी, गोमंतक प्रजा मंडळ, गोमंतकीय तरुण संघ, गोवा सेवा संघ, आझाद गोमंतक दल, गोवा विमोचन समिती इत्यादी संघटनांची स्थापना
  • पोर्तुगीज राजवटीपासून मुक्तता करणे आणि गोवा भारतमातेला जोडणे हा उद्देश
  • टी.बी. कुन्हा, डॉ. ज्युलिआंव मिनेझिस, श्यामराव मडकईकर, पा.पु. शिरोडकर, पुरुषोत्तम काकोडकर, पीटर आल्वारिश, विश्‍वनाथ लवंदे आदी नेत्यांकडे गोवा मुक्तीसाठीच्या चळवळीचे नेतृत्व
  • गोव्यातील लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण

दीपाजी राणे यांचा उठाव

पोर्तुगीज सरकारने वर्ष १८५१ मध्ये एक आदेश काढला. त्यामध्ये हिंदूंना पाश्‍चात्त्य कपडे घालणे सक्तीचे केले. सण-उत्सव साजरे करणे, पालखी मिरवणूक काढणे, कपाळावर कुंकू लावणे आणि घरासमोर तुळशीवृंदावन उभारणे यांवर बंदी घालण्यात आली. या जुलमी आदेशाच्या विरोधात हिंदूंमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. दीपाजी राणे यांच्या नेतृत्वाखाली या विरोधात बंड पुकारण्यात आले. दीपाजी राणे यांनी पोर्तुगिजांना सळो कि पळो करून सोडले आणि पोर्तुगीज सरकारला हा जुलमी आदेश मागे घेण्यास भाग पाडले.

डॉ. राम मनोहर लोहिया

डॉ. राम मनोहर लोहिया यांनी १८ जून १९४६ या दिवशी मडगाव येथे नगरपालिका मैदानावरून गोव्यातील लोकांना संबोधित केले. त्यांनी गोव्यातील जनतेला नागरी स्वातंत्र्यासाठी पोर्तुगीज सत्तेच्या विरोधात लढा देण्याचे आवाहन केले. त्यांनी गोव्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीची ठिणगी पेटवली. त्यामुळे १८ जून हा दिवस ‘क्रांतीदिन’ म्हणून ओळखला जातो.

पोर्तुगिजांवर छत्रपती शिवाजी महाराजांकडून आक्रमण

बेतुल येथील छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यावरील समुद्राच्या बाजूकडील तोफ

गोव्यात पोर्तुगिजांनी हिंदूंचा धार्मिक छळ मांडला होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज प्रचंड क्रूद्ध होते. वर्ष १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाचा पराभव करून कुडाळ, पेडणे आणि डिचोली कह्यात घेतले. वर्ष १६६७ मध्ये त्यांनी बार्देशवर आक्रमण केले आणि पोर्तुगिजांना शांती प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले.

‘ऑपरेशन विजय’ ते भारताचे २५ वे घटकराज्य

ऑपरेशन विजय
  •  भारत सरकारने अखेर गोवा मुक्तीसाठी लष्करी कारवाईचा निर्णय घेतला.
  •  भारतीय सैन्यदलाने ‘ऑपरेशन विजय’ द्वारे गोव्यावर आक्रमण करून पोर्तुगिजांच्या तावडीतून गोव्याची मुक्तता केली आणि १९ डिसेंबर १९६१ या दिवशी गोवा उर्वरित भारतात सहभागी झाला.
  • २४ सप्टेंबर १९६२ या दिवशी भारतीय संसदेने १२ वी घटनादुरुस्ती संमत करून गोवा, दमण आणि दिवला संघप्रदेशाचा दर्जा दिला.
  • गोव्यात डिसेंबर १९६२ मध्ये ३० विधानसभा मतदारसंघ आणि २ लोकसभा मतदारसंघ यांसाठी सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष विजयी झाला आणि २० डिसेंबर १९६२ या दिवशी पहिले लोकप्रिय सरकार सत्तेवर आले.
  • जनमत कौल : गोव्यातील लोकांनी गोवा संघप्रदेशच ठेवण्याचा निर्णय दिला.
  • त्यानंतरच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष पुन्हा सत्तेवर आला.
  • ३० मे १९८७ ला गोवा हे भारताचे २५ वे घटकराज्य बनले.’

गोवामुक्तीसाठी लढणारे सर्व ज्ञात-अज्ञात क्रांतीकारकांना आणि धर्मांतराला विरोध करतांना हुतात्मा झालेल्या सर्वांना अभिवादन !