अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. आनंदिता श्रीवास्तव (वय ७ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. आनंदिता श्रीवास्तव ही एक आहे !

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ –  परात्पर गुरु डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष पंचमी (१९.१२.२०२०) या दिवशी कु. आनंदिता (मीठी) श्रीवास्तव हिचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

(‘वर्ष २०१८ मध्ये कु. आनंदिता श्रीवास्तव हिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती.’- संकलक)

आनंदिता श्रीवास्तव

कु. आनंदिता श्रीवास्तव हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. सौ. कनुप्रिया श्रीवास्तव (आई)

१ अ. मनमिळाऊ : ‘कु. आनंदिता (मीठी) पुष्कळ मनमिळाऊ आहे. तिला सर्वांशी मैत्री करायला हवी असते. ती सर्वांशी पुष्कळ प्रेमाने बोलते आणि मोठ्यांचा आदर करते.

१ आ. तिचे सर्व गोष्टी स्वच्छ ठेवण्याकडे विशेष लक्ष असते.

१ इ. मी स्वयंपाकघरात कामे करतांना मीठी मला सांगते, ‘‘आई, तू जेथून साहित्य घेतेस, त्याच जागी ते परत ठेवत जा. त्यामुळे तुझा वेळ वाचेल.’’

१ ई. इतरांचा विचार करणे : ती लहान असूनही ‘सर्वांच्या भावनांचा विचार केला पाहिजे’, असे म्हणते. ती स्वतःही त्यासाठी दक्ष असते. समजा, मी एखादा पदार्थ बनवल्यावर तो बिघडला, तर ती सर्वांना सांगते, ‘‘या पदार्थाला वाईट म्हणू नका, नाहीतर आईला वाईट वाटेल.’’

१ उ. मीठी आपले साहित्य सहजतेने दुसर्‍यांना देते.’

२. सौ. मिथिलेश कुमारी (आजी, आईची आई)

२ अ. आढावा सत्संगात स्वतःची चूक प्रांजळपणे सांगणे : ‘अयोध्या येथील साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा-सत्संग सप्ताहातून एकदा ‘ऑनलाईन’ होतो. एकदा मी देवघरात ‘इयरफोन’ लावून तो सत्संग ऐकत होते. तेव्हा मीठी आली. त्या वेळी आमच्यात पुढील संभाषण झाले.

मीठी : आजी, तू काय ऐकत आहेस ?

मी (तिला समजावून सांगत) : आमचा स्वभावदोष-निर्मूलनाचा आढावा-सत्संग चालू आहे आणि सर्व साधक आपापल्या चुका सांगत आहेत.

मीठी : आज माझ्याकडूनही एक चूक झाली आहे. मला माझी चूक सत्संगात सांगायची आहे.

(मी उत्तरदायी साधकांची अनुमती घेऊन तिला ‘इयरफोन’ आणि ‘माईक’ दिला.)

मीठी : ‘आज मी आईशी मोठ्याने ओरडून बोलले’, अशी माझ्याकडून चूक झाली आणि त्यासाठी मी तिची क्षमाही मागितली.

२ आ. इतरांना भोजनापूर्वी प्रार्थना करण्याची आठवण करून देणे

१. एकदा मी महाप्रसाद ग्रहण करण्यापूर्वी प्रार्थना करायला विसरले. मी महाप्रसाद ग्रहण करणार, त्या क्षणी मीठीने मला सांगितले, ‘‘आजी, आज तू प्रार्थना केली नाही. आधी प्रार्थना कर आणि मगच भोजन कर.’’

२. ती आपल्या आजीच्या (वडिलांच्या आईच्या) घरी जाते, तेव्हा ती आपल्या चुलत बहीण-भावांकडूनही भोजनापूर्वी प्रार्थना करवून घेते.

२ इ. आजीला त्रास होत असतांना तिच्यासाठी उपाय करणे : एकदा घरात मी आणि मीठी दोघीच होतो. मला त्रास होऊ लागला; म्हणून मी पलंगावर आडवी झाले. त्या वेळी माझे डोळे मिटले होते. मी अर्धवट बेशुद्धावस्थेत होते. त्या वेळी मी बोलू किंवा उठू शकत नव्हते. मीठीने मला पाहिले आणि ती त्वरित एक पेलाभर पाणी घेऊन आली. तिने माझ्या तोंडवळ्यावर थोडे पाणी शिंपडले. त्या वेळी मी माझे डोळे उघडले. नंतर ती मोरपीस घेऊन आली आणि माझ्या भोवतालचे आवरण काढू लागली. ती मला पाणी पिण्यास सांगत होती; परंतु मला उठवत नव्हते. तेव्हा तिने माझ्या तोंडात थोडेसे पाणी घातले. थोडे पाणी प्यायल्यावर मी उठू शकले. तेव्हा ती मला म्हणाली, ‘‘कृष्णमामा तुला लवकर बरे करील.’’

२ उ. भाव

२ उ १. सकाळी पूजेच्या वेळी ध्यानमंदिरात येऊन कृष्णाच्या मूर्तीची मनापासून पूजा करणे : अयोध्या सेवाकेंद्रातील ध्यानमंदिरात मी प्रतिदिन प्रातःकाळी पंचोपचार पूजा करते. मीठी लवकर उठते. तेव्हा ती माझ्या समवेत ध्यानमंदिरात येते. ती पुष्कळ मनापासून प्रथम राधा-कृष्णाच्या मूर्तीला स्नान घालते आणि त्यांना अतिशय प्रेमाने पुसते. ती त्यांना वस्त्र नेसवते. राधा-कृष्णाचा छोटासा मुकूट आणि हार आहे. तो ती त्यांना घालते. त्यानंतर त्यांना अष्टगंध लावून भावपूर्वक खडीसाखरेचा नैवेद्य दाखवते. त्यानंतर ती भगवान नर्मदेश्‍वराला ३ वेळा जलाभिषेक करते आणि त्याला अष्टगंध लावते. त्यानंतर ती तेथे थोडा वेळ बसून नामजपही करते.

२ उ २. कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी सकाळी केसांत मोरपीस खोचून आणि हातात बासरी घेऊन ध्यानमंदिरात येणे अन् कृष्णाच्या चित्रासमोर बासरी वाजवणे : कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मी ध्यानमंदिरात पूजा करत होते. मीठी साधारणतः त्या वेळी झोपलेली असते; परंतु त्या दिवशी सकाळी ती अकस्मात् ध्यानमंदिरात आली. मी तिच्याकडे पाहिले. तिने तिच्या केसांत मोरपीस लावले होतेे आणि हातात बासरी घेतली होती. ती श्रीकृष्णाच्या चित्राकडे गेली आणि बासरी वाजवू लागली. तेव्हा माझी भावजागृती झाली. ‘ही केव्हा बरे उठली असेल आणि तिने कृष्णासारखे रूप केव्हा धारण केले असेल ?’, असे विचार माझ्या मनात येऊन मला आश्‍चर्य वाटले.

२ उ ३. पू. नीलेश सिंगबाळ यांनी आंबे पाठवल्यावर पुष्कळ आनंदी होऊन नाचणे आणि ‘कृष्णमामाचा प्रसाद किती गोड आहे !’, असे म्हणत नाचत नाचतच आंबे खाणे : मागील वर्षी पू. नीलेशदादांनी (पू. नीलेश सिंगबाळ यांनी) वाराणसी सेवाकेंद्रातून तेथील आंब्याच्या झाडाचे २ आंबे मीठीसाठी पाठवले होते. ते पाहून मीठी फार आनंदी झाली आणि नाचायला लागली. ‘कृष्णमामाने माझ्यासाठी आंबे पाठवले आहेत. हा त्याचा प्रसाद आहे. तो मीच खाणार’, असे ती म्हणाली. ‘कृष्णमामाचा प्रसाद किती गोड आहे !’, असे म्हणत ती नाचत नाचतच आंबे खात होती.’

३. डॉ. नंद किशोर वेद (आजोबा, आईचे वडील)

३ अ. कृष्णाशी खेळणे : ‘घरात, म्हणजे अयोध्या येथील सेवाकेंद्रात सनातन-निर्मित भगवान श्रीकृष्णाचे मोठे चित्र लावले आहे. ती श्रीकृष्णाला ‘कृष्णमामा’ म्हणते. लहानपणापासून आनंदिता रात्री झोपतांना तिच्या समवेत काही खेळणी घेऊन झोपते आणि रात्री जाग आल्यावर ती त्या खेळण्यांशी खेळते. तिला समजायला आणि बोलायला यायला लागल्यापासून ती ‘रात्री कृष्णमामा माझ्याशी खेळायला येतो’, असे आम्हाला सांगते.

३ आ. ‘आजोबांना सतत नामजप कसा करायचा ?’, याविषयी सांगणारी आनंदिता ! : एकदा आनंदिताशी भ्रमणभाषवर बोलतांना माझा तिच्याशी झालेला संवाद पुढे दिला आहे.

मी : तू नामजप करतेस का ?

आनंदिता : हो.

मी : तुझा नामजप किती वेळ होतो ?

आनंदिता : माझा नामजप अखंड चालूच असतो. मी खेळत असतांनाही माझा नामजप चालू असतो. अभ्यास करतांना, भोजन करतांना किंवा मी दूरचित्रवाणी पहाते, त्या वेळीही माझा नामजप चालू असतो.

मी : तू हे कसे करतेस ? मलाही शिकव, म्हणजे मीही तसे करीन.

आनंदिता : आपली दोन मने असतात ना ?

मी : हो, माझी दोन मने आहेत.

आनंदिता : मग एका मनाला सांगायचे, ‘भोजन कर’ आणि दुसर्‍या मनाला सांगायचे, ‘नामजप कर !’ अशा प्रकारे तुमचे कामही होईल आणि नामजपही होईल.

४. स्वभावदोष

हट्टीपणा आणि अपेक्षा करणे’


यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक