१०० कोटी हिंदू असलेल्या भारताला संवैधानिकदृष्ट्या ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील धर्मप्रेमींचा कृतीशील होण्याचा निर्धार !

सुनील घनवट

यवतमाळ, १८ डिसेंबर (वार्ता.) – भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेल्या ७३ वर्षांत हिंदूंच्या समस्या सुटलेल्या नाहीत. हिंदूंना धर्मशिक्षणापासून वंचित ठेवले गेले. ८ राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक झाले आहे. ‘धर्मनिरपेक्ष’ या गोंडस नावाखाली हिंदूंवर आघात होत आहेत. त्यामुळे १०० कोटी हिंदू असलेल्या भारताला संवैधानिकदृष्ट्या ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली. ते ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची मूलभूत संकल्पना’ याविषयी १३ डिसेंबर या दिवशी जिल्ह्यामध्ये पार पडलेल्या ‘ऑनलाईन’ बैठकीत बोलत होते.


या वेळी सनातन संस्थेच्या सौ. सुनंदा हरणे यांनी ‘धर्मसंस्थापनेच्या कार्यात साधनेचे महत्त्व’ याविषयी मार्गदर्शन केले. शिबिरातील विषय ऐकल्यानंतर सहभागी धर्मप्रेमींनी ‘नववर्ष १ जानेवारीऐवजी गुढीपाडव्याला साजरे करणार, कपाळाला टिळा लावणार, धर्मकार्यासाठी वेळ देणार, मंदिरात नियमित दर्शन घेऊन प्रार्थना करणार, फोनवरून ‘हॅलो’ऐवजी ‘नमस्कार’ किंवा ‘जय श्रीराम’ म्हणणार’, असा कृतीशील होण्याचा निर्धार व्यक्त केला.