सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या आई श्रीमती प्रभावती गजानन शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ८८ वर्षे) देवद येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला आहेत. त्यांच्या सूनबाई सौ. मीनल शिंदे यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. कौटुंबिक दायित्व निभावणे
१ अ. परिस्थिती स्वीकारणे आणि स्थिर राहून मुलांना आधार देणे : ‘माझ्या सासर्यांचे (कै. गजानन हरिभाऊ शिंदे) त्यांच्या वयाच्या ४९ व्या वर्षी हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले. त्या वेळी त्यांची मुले (मोठा मुलगा श्री. प्रमोद शिंदे (आताचे कै. प्रमोद शिंदे), श्री. राजेंद्र शिंदे (आताचे सद्गुरु राजेंद्र शिंदे) आणि श्री. विलास शिंदे) शिकत होती आणि कुटुंबात कुणी नोकरी करत नव्हते. त्यामुळे कुटुंबाचे पूर्ण दायित्व माझ्या सासूबाई (आई) आणि त्यांची मुले यांच्यावर आले. तेव्हा आईंनी परिस्थिती खंबीरपणे स्वीकारली. त्या कालावधीत आईंनी स्वतःला सावरून मुलांनाही आधार दिला. आईंनी काटकसर करून घर सांभाळले. मुलांनी गुलकंद विकणे, पंचांग विकणे, कंदिल विकणे, तसेच सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी मुलांच्या शिकवण्या घेणे, अशा प्रकारे शिक्षण पूर्ण केले.
१ आ. मुलांना आहे त्या परिस्थितीत आनंदाने रहायला शिकवणे आणि मुलांवर सुसंस्कार करणे : कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असूनही आईंनी कधीच मुलांना कुणासमोर हात पसरायला लावले नाही. आईंनी नेहमीच मुलांना असेल त्या परिस्थितीत आनंदाने रहायला शिकवले. मुले खेळत असतांना कधी भांडण झाले, तर आई प्रथम स्वतःच्या मुलांना ‘‘तुम्ही काय चूक केली ? ते सांगा’’, असे म्हणून समज द्यायच्या. आईंनी मुलांना त्यांच्या बालवयातच ‘कुणाकडूनही काही वस्तू घ्यायची नाही आणि खोटे बोलायचे नाही’, असे शिकवले होते.
२. व्यवस्थितपणा
आईंना व्यवस्थित रहायला फार आवडते. आई या वयातही नित्य नेमाने वेणी-फणी करतात. त्यांना आता वयोमानानुसार साडी नेसायला जमत नाही, तरीही त्या सणाच्या दिवशी आवर्जून साडी नेसतात.
३. धार्मिक वृत्ती
आई सर्व सणवार परिस्थितीनुसार साजरे करत असत. आमच्या घरी एखादी सुवासिनी आल्यास आई मला ‘‘त्यांना हळदी-कुंकू लाव आणि एखादे फळ दे’’, असे सांगत असत.
४. नातेवाइकांविषयी आपुलकी आणि प्रेम असणे
आमचे एकत्र आणि मोठे कुटुंब असल्यामुळे घरात नातेवाइकांची पुष्कळ ये-जा असे. आई घरी आलेल्या पाहुण्यांना प्रत्येक वेळी जेवून पाठवत असत. त्या प्रत्येक नातेवाइकाची आत्मीयतेने विचारपूस करत. एखादा नातेवाईक रुग्णाईत किंवा अडचणीत असल्यास आई त्याला आपल्या परीने जेवढे साहाय्य करता येईल, तेवढे करत असत. त्यांनी सुनांनाही कधी अंतर दिले नाही.
५. सुगरण असणे
मोठे कुटुंब असूनही आई प्रत्येकाच्या आवडी-निवडीप्रमाणे पदार्थ बनवत असत. माझे लग्न झाल्यावर त्यांनी मलाही उत्तम स्वयंपाक करायला शिकवले.
६. उतारवयातही आश्रमजीवन स्वीकारणे
वर्ष २०१८ मध्ये आई देवद आश्रमात रहायला आल्या. पूर्वी त्या कधीच कुणाकडे रहायला गेल्या नव्हत्या. त्यामुळे ‘त्या आश्रमजीवन स्वीकारतील कि नाही ?’, असा प्रश्न होता; पण त्यांनी आश्रमजीवन सहजतेने स्वीकारले.
७. सेवाभाव
आरंभी आई नामजपाच्या माळा सिद्ध करण्याची सेवा करत. त्यानंतर त्या भाजी निवडणे, लसूण सोलणे, अशा सेवा जमेल तशा करत.
८. इतरांचा विचार करणे
२०.१.२०२४ या दिवशी आई पडल्या; म्हणून मी त्यांच्या सेवेसाठी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात आले. त्या वेळी आईंना उठता-बसता येत नव्हते. त्या सर्व गोष्टी पलंगावरच करत होत्या; पण त्याही स्थितीत त्या ‘माझे सर्व इतरांना करायला लागते’, या विचाराने स्वतःहून जमतील तशा गोष्टी करत होत्या.
९. सहजतेने बोलणे
आई त्यांच्या सेवेत असलेल्या साधिकांशी मोकळेपणाने बोलतात.
१०. साधकांप्रती जिव्हाळा वाटणे
एकदा एक साधिका पुष्कळ रुग्णाईत होती. तेव्हा आईंनी तत्परतेने वैद्यांना तिच्यावर उपचार करायला सांगितले. एखादा साधक आईंना भेटायला आल्यास आई त्याला खाऊ देऊनच पाठवतात. ‘त्यांच्या मनात आश्रमातील साधकांविषयी जिव्हाळा निर्माण झाला आहे’, असे मला जाणवते. आईंचे आवरून झाले की, त्या थोडा वेळ आश्रमातील मार्गिकेत बसतात. त्या वेळी त्या तेथून येणार्या-जाणार्या साधकांची विचारपूस करतात.
११. गुरुकृपा आणि प्रबळ इच्छाशक्ती यांच्या बळावर गंभीर आजारपणातून लवकर बर्या होणे
आई कितीतरी वेळा तोल जाऊन पडल्या आहेत. वर्ष २०२२ मध्ये त्या आश्रमातील प्रसाधनगृहात जात असतांना अकस्मात् तोल जाऊन जोरात पडल्या. तेव्हा त्यांच्या डोक्याला पुष्कळ लागले होते. त्या वेळी त्यांच्या सर्व वैद्यकीय पडताळण्या केल्यावर लक्षात आले, ‘त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.’ त्या वेळी त्या कुणालाही ओळखत नव्हत्या; पण त्यांची इच्छाशक्ती एवढी प्रबळ होती की, त्यांनी त्यावर मात केली. त्यांनी नामजपादी उपाय नित्यनेमाने केले. त्यामुळे त्या लवकर बर्या झाल्या. हे केवळ त्यांच्यावर गुरुकृपा असल्यामुळेच शक्य झाले.
१२. देवाच्या अनुसंधानात असणे
आई आरंभापासूनच सात्त्विक वातावरणात राहिल्या आहेत. त्यांचा नामजप नित्यनेमाने चालूच होता. त्या देवद आश्रमात रहायला आल्यावर त्यांची नामजप करण्याची ओढ वाढली आहे. त्या दिवसभर विठ्ठल, पांडुरंग यांचा धावा करत असतात. त्या सर्व दुःख पांडुरंगाला सांगतात.
१३. भाव
१३ अ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या प्रती भाव : माझे यजमान सद्गुरु राजेंद्र शिंदे हे आईंचे सुपुत्र आहेत. सद्गुरु दादा प्रतिदिन आईंना भेटायला येतात. तेव्हा आई झोपलेल्या किंवा बसलेल्या असल्या, तरीही त्या तत्परतेने उभ्या राहून सद्गुरु दादांना दोन्ही हात जोडून भावपूर्ण नमस्कार करतात.
१३ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती भाव : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त त्यांचे छायाचित्र असलेले उत्सवचिन्ह (बिल्ला) साधकांना दिले. त्या वेळी आईंनाही उत्सवचिन्ह िमळाले. ते पाहून आईंची पुष्कळ भावजागृती झाली. त्या साधकांना उत्सवचिन्ह दाखवून म्हणायच्या, ‘‘मी सच्चिदानंद परब्रह्म यांची आठवण काढली आणि त्यांनी मला त्यांचे छायाचित्र पाठवले.’’ आईंच्या चेहर्यावरचे भाव पाहून आम्ही आनंद अनभुवत होतो.
१४. आईंची सेवा करतांना साधिकेला स्वतःत जाणवलेले पालट
अ. काही प्रसंगांमध्ये स्वीकारण्याची स्थिती वाढवल्यामुळे प्रसंग हाताळतांना सोपे जाऊ लागले आहे.
आ. आईंची सेवा करतांना मला वयस्कर व्यक्तींच्या स्थितीची जाणीव होऊ लागली. ‘मीही वयस्कर होणार आहे’, याची जाणीव मला होऊ लागली. त्यामुळे माझे मन अधिकाधिक शांत आणि स्थिर होऊ लागले आहे.
‘हे गुरुमाऊली, केवळ तुमच्या कृपेमुळेच मी आईंची सेवा करू शकत आहे. देवा, मला असेच सेवारत रहाता येऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे. ‘गुरुमाऊली, हे लिखाण लिहून घेतल्याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. मीनल राजेंद्र शिंदे (श्रीमती प्रभावती शिंदे यांची सून), फोंडा, गोवा. (२०.१०.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |