गोव्यात संस्कृतभारतीकडून शालेय मुलांना घरबसल्या संस्कृत शिकण्यासाठी उपक्रम

फोंडा, १२ डिसेंबर (वार्ता.) – शालेय मुलांसाठी घरबसल्या संस्कृत शिकण्याची सुलभ आणि उपयुक्त अशी संधी गोव्यात ‘संस्कृतभारती’कडून देववाणी परीक्षा योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संदर्भातील अधिक माहितीसाठी कौस्तुभ कारखानीस, प्रकल्प संचालक, देववाणी संस्कृतभारती, ९८२३९४५०९४ अथवा [email protected] या इमेलवर किंवा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक ९५२७०८२९८३ यावर संपर्क साधावा, असे कळवण्यात आलेे आहे.

कोरोनाच्या संकटामुळे शाळांच्या संदर्भात जे नियम लागू झाले, त्यामुळे ‘ऑनलाईन’ शिक्षणपद्धतीचा अवलंब करून संस्कृतभारतीने मुलांचा आवडीचा विषय ‘देववाणी’चे ‘व्हिडिओ’ (ध्वनीचित्रीकरण) बनवले आहेत. संस्कृत ही साक्षात देवांची वाणी म्हणून या अभ्यासक्रमाचे नामकरण ‘देववाणी’ असे करण्यात आले आहे. मुलांना देववाणीचा प्रत्येक धडा सोपेपणी अवगत व्हावा यासाठी सुलभ आणि आकर्षक पद्धतीने ‘व्हिडिओ’ (ध्वनीचित्रीकरण) बनवले आहेत. यामुळे विशेष परिश्रम न घेता अगदी अल्प वेळेत अधिकाधिक मुलांना शिकता येईल. या अभ्यासक्रमाच्या परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस होतील. त्यासठी लागणार्‍या प्रश्‍नपत्रिका ‘ऑनलाईन’ पद्धतीने किंवा प्रत्यक्ष पाठवण्यात येतील. इयत्ता पाचवी आणि त्यापुढील इयत्तांचे विद्यार्थी हा अभ्यासक्रम निवडू शकतात. याचा अधिक लाभ पाचवीच्या विद्यार्थ्यांना होतो; कारण पाचवीचे विद्यार्थी नववी इयत्तेत जाईपर्यंत ४ वर्षांत सर्व स्तर पूर्ण करता येतात. याचा त्यांना नववी आणि दहावीच्या परीक्षेत चांगला उपयोग होईल. संयोजकांकडून पाठवण्यात येणार्‍या लिंकद्वारे सर्वांनी नावनोंदणी करून शुल्क ‘ऑनलाईन’ पद्धतीने भरावे लागेल. देववाणी परीक्षा योजनेचे वार्षिक मूल्य १२० रुपये आहे. नोंदणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना टपालाने पुस्तके पाठवण्यात येतील.