हे प्रशासनाला लज्जास्पद ! मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून त्वरित पुढील कार्यवाहीचा आदेश द्यावा, ही अपेक्षा !
म्हापसा, ११ डिसेंबर (वार्ता.) – एकतानगर, म्हापसा येथील गृहनिर्माण वसाहतीतील (हाऊसिंग बोर्डमधील) ‘हिल व्हीव रेसिडन्सी’ या निवासी संकुलात अनधिकृतपणे चालू केलेले ‘उस्मानिया मशीद मरकज तबलिगी’ हे धार्मिक स्थळ त्वरित बंद करण्याची मागणी स्थानिकांनी शासनाकडे केली आहे. विशेष म्हणजे एकतानगर, म्हापसा येथील रहिवासी गेली १५ वर्षे या अनधिकृत धार्मिक स्थळाच्या विरोधात लढा देत आहेत. गोवा राज्य सध्या ६० वा गोवा मुक्तदिन साजरा करत असल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने या समस्येवर आता त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरत आहे. या संदर्भातील निवेदन त्यांनी २३ नोव्हेंबरला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर केले आहे, तसेच येथील जिल्हाधिकारी कार्यालयात वेळोवेळी निवेदने देऊन पाठपुरावा केला आहे. म्हापसा नगरपालिकेलाही त्यांनी कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन दिले आहे.
एकतानगर, म्हापसा येथील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ष २००५ मध्ये एका मुसलमान व्यक्तीने ‘हिल व्हीव रेसिडन्सी’ या निवासी संकुलात ‘पॉप्युलर एज्युकेशन ट्रस्ट’ या नावाने एक घर विकत घेतले.
एखादी व्यक्ती या घराचा निवासी स्तरावर वापर करणार, असे स्थानिकांना वाटले; मात्र या ठिकाणी कोणतीही अनुमती न घेता शुक्रवारी आणि रमजान मासात मोठ्या प्रमाणावर मुसलमान लोक एकत्र येऊ लागले. निवासी संकुलातील घरात सार्वजनिक स्तरावर धार्मिक कार्यक्रम घेता येत नसल्याने या ठिकाणी या वेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. या वेळी तालुक्याच्या तत्कालीन उपजिल्हाधिकार्यांनी हस्तक्षेप करून धार्मिक तेढ निर्माण होऊ दिला नाही. उपजिल्हाधिकार्यांनी ‘पॉप्युलर एज्युकेशन ट्रस्ट’ या संस्थेला या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे कार्यक्रम घेण्यास मनाई करणारा आदेश ६ ऑक्टोबर २००५ या दिवशी दिला. उपजिल्हाधिकार्यांच्या या आदेशाला ‘पॉप्युलर एज्युकेशन ट्रस्ट’ या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात आव्हान दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने उपजिल्हाधिकार्यांना सामाजिक सलोखा टिकून रहाण्यासाठी या विषयावर नव्याने आदेश देण्यास सांगितले. (तबलिगीवाल्यांवर कारवाई झाल्यासच गोव्यातील धार्मिक सलोखा टिकून राहील ! – संपादक) तेव्हापासून हे प्रकरण आता उपजिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित आहे. या प्रकरणी आता एकतानगर, म्हापसा येथील रहिवाशांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही किंवा या प्रकरणावर सुनावणीसाठी वारंवार पुढील दिनांक दिला जात आहे. उपजिल्हाधिकारी या प्रकरणी निवाड्यासाठी कालावधी मागत आहेत.
वास्तविक एकतानगर, म्हापसा येथील ‘उस्मानिया मशीद मरकज तबलिगी’ हे धार्मिक स्थळ निजामुद्दीन, देहली येथील तबलिगी मरकज यांच्याशी निगडीत आहे. ‘तबलिगी मरकज’ यांनीच एकतानगर, म्हापसा येथील धार्मिक स्थळाला ‘उस्मानिया मशीद मरकज तबलिगी’ हे नाव दिले आहे. संशयास्पद कारवायांमुळे ‘तबलिगी मरकज’ यांच्यावर अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. एकतानगर, म्हापसा येथील धार्मिक स्थळावर आता शुक्रवारी ४५० ते ५०० लोक एकत्र येत असतात आणि यामधील बरेच लोक अनोळखी असतात. हे अनोळखी लोक निवासी संकुलात मुक्तपणे फिरत असतात. या अनोळखी व्यक्तींमुळे स्थानिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या परिसरात चोरी, मारामारी, खून आदी प्रकारांमध्येही वाढ झाली आहे. एकतानगर, म्हापसा येथे अनेक ज्येष्ठ नागरिक रहातात आणि त्यांना शांततेने जीवन घालवावे, असे वाटत आहे. शासनाने या प्रकरणी हस्तक्षेप करणे अत्यावश्यक आहे.