१. वाराणसी सेवाकेंद्रात वास्तव्याला असलेले पू. नीलेश सिंगबाळ यांच्या कक्षात साधकांना सुगंध येणे आणि ‘हा सुगंध गुरुतत्त्वाचा आहे’, असे जाणवणे
‘पू. नीलेश सिंगबाळ यांचे वाराणसी सेवाकेंद्रात वास्तव्य असते. १७.१०.२०२० या दिवशी ते काही कारणास्तव रामनाथी आश्रमात गेले. ३०.१०.२०२० या दिवशी त्यांचे वास्तव्य असलेल्या सेवाकेंद्रातील कक्षात गेल्यावर मला पुष्कळ सुगंध आला. त्या वेळी मला सर्दी झाली होती. मला अन्य कशाचाही सुगंध येत नव्हता; मात्र पू. नीलेशदादांचे वास्तव्य असलेल्या कक्षात मला भरभरून सुगंध येत होता. माझे मन त्या सुगंधाने शांत, स्थिर आणि अंतर्मुख झाले. ‘हा सुगंध गुरुतत्त्वाचा आहे’, असे मला जाणवले. मला झालेली सर्दीही नाहीशी झाली. काही वेळाने मी सेवाकेंद्रातील अन्य साधकांनाही ‘पू. नीलेशदादांच्या कक्षात काय जाणवते ?’, असे विचारले. त्या वेळी सर्व साधकांना सुगंध आला आणि श्री. गुरुराज प्रभु यांना ‘हा सुगंध गुरुतत्त्वाचा आहे’, असे जाणवले.
२. पू. नीलेशदादांच्या कक्षातील सुगंध एक मास टिकणे आणि कक्षातून प्रक्षेपित होणार्या चैतन्यामुळे साधकांवर उपाय होणे
मागील एक मासापासून पू. नीलेशदादांच्या कक्षात सुगंध येत आहे. ‘त्यांच्या कक्षातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होऊन सर्व साधकांवर उपाय होत आहेत’, असे वाटते. सुगंध येण्याच्या काही दिवसांपूर्वी मला, तसेच आश्रमातील अन्य साधकांनाही पुष्कळ चांगले वाटत होते, तसेच हलकेपणा आणि उत्साह जाणवत होता.
३. ‘पू. नीलेशदादांच्या खोलीतील चैतन्यामुळे सेवा आपोआप होत आहेत’, असे साधकांना वाटून त्यांना आनंद मिळणे
या कालावधीत सेवाकेंद्रात नूतनीकरणाचे काम चालू असल्याने सेवांचे प्रमाण अधिक होते. ‘सेवा आपण करत नसून त्या आपोआप होत आहेत’, असे सर्वांनाच जाणवत होते. ‘असे का होत आहे ?’, ते साधकांना कळत नव्हते. साधकांना सेवा करतांना आनंद मिळत होता. ‘पू. नीलेशदादांच्या कक्षातील चैतन्यामुळे सर्वांना आनंद मिळत आहे’, असे मला वाटले.’
– सौ. श्रेया प्रभु, वाराणसी (२६.११.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |