महाराष्ट्रात ‘भारत बंद’ पाळून ठिकठिकाणी आंदोलन आणि फेरी यांचे आयोजन

मुंबई – कृषी विधेयकाच्या विरोधात महाराष्ट्रात ‘भारत बंद’ पाळून ठिकठिकाणी आंदोलने, मोर्चा आणि फेरी यांचे ८ डिसेंबरला आयोजन करण्यात आले होते.

ठाणे  – येथील ‘इस्टर्न हायवे’वर भारतीय जय हिंद पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आंदोलकांना पोलिसांनी कह्यात घेतले. शेतकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबई आणि नवी मुंबई येथील सर्व वाहतूक संघटनांनी पनवेल ते मरिन ड्राईव्हपर्यंत दुचाकीवरून फेरी काढली.

नवी मुंबई – नवी मुंबईतील माथाडी कामगार संघटनेकडूनही बंदला पाठिंबा देण्यात आला. मानखुर्द येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बंदला पाठिंबा देण्यासाठी मोर्चा काढला. बंदला पाठिंबा देण्यासाठी नवी मुंबईतील वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आली. अन्नधान्य, भाजी, फळ, कांदा-बटाटा, मसाला यांचा बाजार बंद ठेवण्यात आला होता.काँग्रेसच्या वतीने वाशी, नेरूळ येथे शेतीविषयक विधेकांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

सातारा – सातारा शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठा बंद होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवसेनेच्या वतीने शहरातून दुचाकी फेरी काढून पाठिंबा दर्शवण्यात आला.

बीड – बीड शहरातून सोलापूर, परळी, नगर, संभाजीनगर, जालना आदी ठिकाणी जाणार्‍या सर्व बसगाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या.

कोल्हापुरात बाजारपेठा आणि बहुतांश रिक्शा वाहतूक बंद !

कोल्हापूर – कोल्हापूर शहरात लक्ष्मीपुरी धान्य बाजार, बाजार समिती, मार्केट यार्ड, शाहूपुरी येथील बाजारपेठा बंद होत्या. काही रिक्शा व्यावसायिकांनी बंदला पाठिंबा दिल्याने रिक्शा वाहतूक ठप्प होती. शहरात बाजार समिती, भाजीपाला मार्केट, सराफ बाजार बंद होता. शहर वाहतुकीसह ग्रामीण भागातील एस्.टी. वाहतूक सुरळीत चालू होती.

१. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्यांच्या शिरोळ येथील निवासस्थानाच्या बाहेर विधेयकाची होळी केली. नंतर तेथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.

२. कोल्हापूर शहरात बाल-अवधूत नगर येथे शेतकर्‍यांनी स्वत:ला भूमीत गाडून घेऊन केंद्र सरकारचा निषेध केला.

३. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कार्यालयात काळा झेंडा उभारण्यात आला होता. पालकमंत्री सतेज पाटील या वेळी उपस्थित होते.

४. स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांनी सांगली-कोल्हापूर महामार्ग काही काळ रोखून धरला होता. त्यामुळे काही काळ सर्व बसेस जयसिंगपूर बसस्थानकातच थांबवण्यात आल्या होत्या.

५. वारणा-कोडोली परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

सांगलीत बंदला संमिश्र प्रतिसाद  !

सांगली – शेतकरी बंदला येथे संमिश्र प्रतिसाद मिळाला. कापडपेठ, व्यापारी पेठ, सोनार पेठ, मारुति रस्ता या प्रमुख पेठांसह शहरात काही ठिकाणी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. बंदचा एस्.टी. वाहतुकीवर विशेष परिणाम दिसून आला नाही; मात्र नेहमीच्या दिवसांपेक्षा प्रवासी काही संख्येने अल्प होते. सांगलीत संजय कोले यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेच्या एका गटाने मोर्चा काढून विधेयकास पाठिंबा दर्शवला. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरात, तसेच जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

सोलापूर येथे ‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद

सोलापूर – केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकर्‍यांनी भारत बंदची हाक दिली होती. या बंदला सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सोलापूर शहरातील बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते, तसेच शहरातील मुख्य बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. परिवहन महामंडळाने काही मार्गावरील बसगाड्या बंद ठेवल्या होत्या, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर आणि जिल्ह्यात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

‘भारत बंद’च्या निमित्ताने लातूरच्या मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट

लातूर – शहरातील मुख्य बाजारपेठेतील व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवून ‘भारत बंद’मध्ये सहभाग नोंदवला. या बंदमध्ये बाजार समिती, अडते, हमाल, माथाडी आदींच्या संघटना सहभागी झाल्याने अडत बाजारात शुकशुकाट होता. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. शहरातील गंजगोलाई परिसरात असलेल्या सर्व बाजारपेठा बंद होत्या.

माकपच्या मोर्च्याला अनुमती नाकारूनही मोर्चा काढल्याने मोर्चेकर्‍यांवर पोलिसांचा लाठीमार

सोलापूर – ‘भारत बंद’च्या निमित्ताने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दत्तनगर येथील कार्यालयातून माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार होता; मात्र कार्यकर्त्यांनी अचानक मोर्च्याचा मार्ग पालटल्याने मोर्च्याला अनुमती नाकारण्यात आली. या वेळी नरसय्या आडम यांनी स्वत:च्या भूमिकेवर ठाम रहात मोर्चा काढला. या वेळी पोलिसांनी मोर्चेकर्‍यांवर लाठीमार करून आंदोलनकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासह अनेक कामगारांना कह्यात घेऊन मुख्यालय येथे नेले.