एका वर्षात ८ प्रकरणे, तर नोव्हेंबर मासात ४ प्रकरणे उघडकीस
राज्यात ‘केमिकल ड्रग्ज’ही बनवले जातात !
अमली पदार्थ व्यवसायावर गेल्या २० वर्षांत वेळीच कारवाई न केल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. अमली पदार्थ प्रकरणी काही राजकारण्यांशी संबंधित व्यक्तींवरही आरोप होता आणि काही पोलीस अधिकार्यांनीही कह्यात घेतलेले अमली पदार्थ परस्पर पुन्हा व्यावसायिकांना विकल्याचेही प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणांकडे कुणी गांभीर्याने न पाहिल्यानेच गोव्याची ही स्थिती झाली आहे. यावर सर्व प्राणीमात्रांचे कल्याण करणार्या हिंदु राष्ट्राची स्थापना, हाच एकमेव पर्याय आहे.
पणजी – चरस, गांजा आदी अमली पदार्थ बनवण्यासाठी वापरला जाणारा प्रमुख घटक म्हणजे ‘कॅनाबिस’ ! या रोपांची लागवड आता गोव्यात केली जात आहे. अशा प्रकारची मागील एका वर्षात ८ प्रकरणेे उघडकीस आली, तर नोव्हेंबर २०२० या एका मासातच ४ प्रकरणे उघडकीस आली आहेत. विदेशी नागरिक निर्जनस्थळी भाडेपट्टीवर सदनिका घेऊन आतमध्ये ‘कॅनाबिस’ची लागवड करत आहेत. पूर्वी अमली पदार्थाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारातील गोवा हा एक महत्त्वाचा दुवा (ट्रान्सिट पॉईंट) मानला जात होता; मात्र आता गोव्याची प्रतिमा अमली पदार्थ बनवणे आणि ‘केमिकल ड्रग्ज’ सिद्ध करण्याचे एक ठिकाण, अशी ओळख झालेली आहे.
कॅनाबिसची लागवड कशा प्रकारे केली जाते?
पेडणे तालुक्यात केरी, पालये, हरमल, मांद्रे आणि मोरजी या भागांत विदेशी नागरिक भाड्याने सदनिका घेऊन गुप्तपणे त्यामध्ये ‘कॅनाबिस’ची लागवड करत आहेत. हा प्रकार सर्रासपणे चालू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘कॅनाबिस’ लागवडीसाठी बियाणे बंगाल, ओडिशा आणि जम्मू-काश्मीर येथून आणली जातात. या राज्यांमधून बियाणांची गोव्यात तस्करी केली जाते. ‘कॅनाबिस’च्या लागवडीविषयी इतरांना माहिती मिळू नये, यासाठी घरामध्येच कृत्रिम वीजव्यवस्था आणि वातानुकूलिन व्यवस्था उभारून ही लागवड केली जाते. ‘कॅनाबिस’ची लागवड कशी करायची, याची माहिती मायाजालवर (इंटरनेटवर) सहजपणे उपलब्ध आहे. घरीच ही लागवड होत असल्याने अन्वेषण यंत्रणांना हे शोधून काढणे कठीण बनत आहे. लागवड करणारे व्यवसायाविषयी गुप्तता ठेवण्यासाठी या व्यवसायात अमली पदार्थ व्यावसायिक, दलाल आदींवर अवलंबून रहात नाहीत, तर सिद्ध झालेला माल ते स्वत: संबंधित ठिकाणी पोचवत असतात. या व्यवसायात चढाओढ नाही. व्यवसाय चालू ठेवण्यासाठी अन्वेषण यंत्रणांना हप्ता द्यावा लागत नाही आणि दलाल नसल्याने त्यांना ‘कमिशन’ द्यावे लागत नाही. यामुळे या व्यवसायात लाभ अधिक असतो. बहुतांश वेळा लागवड करणारे कोणत्याही समस्या निर्माण न होण्यासाठी विदेशी ग्राहकच शोधत असतात.
पेडणे येथे २ मासांत ६ ठिकाणी ‘कॅनाबिस’च्या लागवडीवर छापा
पेडणे येथे मागील २ मासांत ६ ठिकाणी कॅनाबिसची लागवड होत असलेल्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. यामधील कोरगाव, पेडणे येथील छाप्यात २० लाख रुपये मुल्याची ‘कॅनाबिस’ची रोपे, गांजा आणि चरस कह्यात घेण्यात आले. राज्यभरात एकूण सुमारे १५ ठिकाणी अशा प्रकारे छापे टाकण्यात आले आहेत. स्थानिकांच्या मते पेडणे तालुक्यात ‘कॅनाबिस’ची लागवड मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि पोलिसांनी टाकलेले हे छापे म्हणजे ‘हिमनगाचे टोक’ आहे.
राज्यात ‘केमिकल ड्रग्ज’ही बनवले जातात
राज्यात ‘कॅनाबिस’समवेत ‘केमिकल ड्रग्ज’ही बनवले जात आहेत. अशा प्रकारची आतापर्यंत राज्यात २ प्रकरणे उघडकीस आली आहेत. पिसुर्ले येथील औद्योगिक वसाहतीत ‘डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटलिजन्स’ने छापा टाकून ४० कोटी रुपयांचे अमली पदार्थ कह्यात घेतले होते. या वेळी २ ब्रिटीश नागरिक, १ व्हिएतनाममधील नागरिक मिळून एकूण ४ जणांना कह्यात घेण्यात आले होते. गतवर्षी ३० नोव्हेंबर या दिवशी हणजूण येथे एका भाड्याच्या जागेत अमली पदार्थ सिद्ध करतांना एका ऑस्ट्रेलियातील नागरिकाला कह्यात घेतले होते. या वेळी १ कोटी रुपये मुल्याचे अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले होते.
‘युनायटेड नेशन्स कमिशन’ ‘कॅनाबिस’ला औषधाच्या सूचीतून वगळणार
‘कॅनाबिस’च्या लागवडीवर नियंत्रण आणण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनंतर ‘युनायटेड नेशन्स कमिशन’ने ‘कॅनाबिस’ला प्रखर औषधाच्या सूचीतून वगळण्याची प्रक्रिया चालू केली आहे. ‘युनायटेड नेशन्स कमिशन’च्या या प्रस्तावाला भारताने पाठिंबा दिला आहे. भारतात सध्या अन्वेषण यंत्रणांच्या माध्यमातून १ किलो गांजा हा अल्प प्रमाण आणि २० किलो गांजाला मोठे प्रमाण (कमर्शियल क्वांटीटी) मानले जाते, तर रेझिन, चरस किंवा हशीश या प्रकरणी १०० ग्रॅमला अल्प प्रमाण अन् १ किलोला मोठे प्रमाण (कमर्शियल क्वांटीटी) मानले जाते. छाप्यात कह्यात घेतलेल्या प्रमाणाच्या आधारावर शिक्षा होत असते. ‘युनायटेड नेशन्स कमिशन’ ‘कॅनाबिस’ला औषधाच्या सूचीतून वगळणार असल्याने पोलिसांना यापुढे कारवाई करण्यास सुलभ होणार असल्याचे तज्ञांचे मत आहे.